फलटणचे साहित्यिक डॉ. अशोक शिंदे यांना ‘शिविम’चा राज्यस्तरीय ललितेत्तर साहित्य पुरस्कार प्रदान

‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ ग्रंथाचा कोल्हापूर विद्यापीठ शिक्षक संघाकडून गौरव; सातारा येथील अधिवेशनात वितरण

। लोकजागर । फलटण । दि. २३ फेब्रुवारी २०२६ ।

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (शिविम), कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अशोक शिंदे यांना त्यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथासाठी प्रतिष्ठेचा ‘ललितेत्तर साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, साहित्यिक डॉ. रफिक सूरज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा सातारा येथे संपन्न झाला.

निवृत्त प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी दिलेल्या देणगीतून हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. डॉ. अशोक शिंदे यांचा हा ग्रंथ सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाला होता. या ग्रंथाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना, तर प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे. ग्रामीण आणि कृषी संस्कृतीतील ज्या वैभवखुणा आज काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत, अशा १८ साधनांचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व डॉ. शिंदे यांनी अत्यंत ललित आणि रसाळ भाषेत या ग्रंथात शब्दबद्ध केले आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात ग्रामीण संस्कृतीचा हा जिवंत वारसा जपण्याचे काम या ग्रंथाने केले असून, सध्या हा ग्रंथ वाचक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी डॉ. अशोक शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे फलटणच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

Spread the love