। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२६ ।
जगात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नसून, असा कोणताही कॉल किंवा मेसेज आल्यास नागरिकांनी त्याला बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात सायबर भामटे स्वतःला पोलीस किंवा कस्टम अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना ड्रग्ज किंवा बेकायदेशीर पार्सलच्या नावाखाली घाबरवत आहेत. अशा प्रकारे ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली स्क्रीनसमोर बसवून ठेवून लोकांकडून मोठी रक्कम उकळली जात असून, यामध्ये उच्चपदस्थ अधिकारीही फसले आहेत. या फसवणुकीचे जाळे प्रामुख्याने विदेशातून चालवले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक यंत्रणा उभारली असून, कोणत्याही नागरिकाची फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद कॉल आल्यास त्यांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. जर पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लगेच या क्रमांकावर कळवले, तर बँकांच्या समन्वयातून संबंधित रक्कम गोठवणे शक्य होते. केंद्र आणि राज्य सरकार विविध माध्यमांतून या प्रकारांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत असून, नागरिकांनी कोणत्याही भीतीला बळी न पडता जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
