शेतीभोवती ‘सोलर झटका’ आणि चर खोदण्याची आक्रमक मागणी
। लोकजागर । फलटण । दि. १ मार्च २०२६ ।
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणासोबतच वन्य प्राण्यांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे संकटात सापडला आहे. कालच विडणी (ता. फलटण) येथे रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून, बिबट्या आणि रानडुंकरांनी संपूर्ण तालुक्यात दहशत माजवली आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना तातडीने संरक्षण आणि मदत देण्याची जोरदार मागणी केली.
आमदार सचिन पाटील यांनी सभागृहात माहिती दिली की, एकट्या फलटण तालुक्यात रानडुंकरांमुळे आतापर्यंत २५ ते ३० पशुधनांचा बळी गेला असून चालू वर्षात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. “नुकसानीचे पंचनामे होतात, पण प्रत्यक्षात पुरेशी आणि तातडीची मदत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. डोंगरालगत असणाऱ्या वाघोशी, वेळोशी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, गिरवी, उपळवे, तडवळे, ताथवडे यांसारख्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत.
या समस्येवर ठोस उपाययोजना सुचवताना आमदार पाटील यांनी मागणी केली की, डोंगराळ भागातील शेतीभोवती सरकारने तातडीने ‘सोलर झटका पंप’ उपलब्ध करून द्यावेत. तसेच डोंगराच्या कडेला खोल चर खोदल्यास रानडुंकरांचा शेतीतील प्रवेश रोखता येईल. ज्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाण अतिशय जास्त आहे, तिथे वनक्षेत्राला कायमस्वरूपी कुंपण घालणे गरजेचे आहे. मायबाप सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांचे प्राण आणि पिके वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
