। लोकजागर । फलटण । रविवार, दि. ८ मार्च २०२६ ।
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा फलटण तालुक्यातील टप्पा क्र. १ चा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. तालुक्यातील साठे आणि राजाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांच्या माध्यमातून या अभियानास सुरुवात करण्यात आली असून, ७ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात हे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने सुटाव्यात, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. युती शासनाने सुरू केलेल्या या महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रत्यक्ष लाभ आणि दाखल्यांचे वाटप: या शिबिरामध्ये शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत पहिल्याच दिवशी साठे व राजाळे परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या कामांचा निपटारा करून घेतला.
मान्यवरांची उपस्थिती: या शुभारंभ प्रसंगी फलटणच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
