रणजितदादांच्या एका फोनवर नामदार जयकुमार गोरेंचे आश्वासन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विकासाचा नवा संकल्प; नूतन सभापती शिवांजली भोसले यांनी स्वीकारला पदभार
। लोकजागर । फलटण । दि. १९ मार्च २०२६ ।
“फलटण पंचायत समितीचे रूपडे पालटण्याचा संकल्प आम्ही या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर केला आहे. येत्या ३० दिवसांत पंचायत समितीच्या देखण्या नूतन प्रशासकीय भवनाला मंजुरी मिळवून, पुढील ४ महिन्यात त्याचे भूमिपूजन केले जाईल,” अशी ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन सभापती शिवांजली भोसले यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
या सोहळ्याला आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले यांच्यासह पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोन लावला अन् निधी पदरात पाडला!
कार्यक्रमादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना फोन लावून पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी निधीची मागणी केली. नामदार गोरेंनीही या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत, ३१ मार्चपूर्वीच १५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे फलटणच्या वैभवात भर टाकणारी आणि सर्व सोयींनी युक्त अशी ‘विस्तारित’ प्रशासकीय इमारत साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रणजितदादांनीही आमदार सचिन पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, सचिन पाटील यांनी अलीकडेच तालुक्यासाठी विक्रमी ९३ कोटींचा निधी आणून विकासाची गती वाढवली आहे.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “नूतन सभापती धडाडीने काम करून एक आदर्श प्रस्थापित करतील. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.”
मी सर्वांची सभापती: शिवांजली भोसले
पदभार स्वीकारल्यानंतर सभापती शिवांजली भोसले म्हणाल्या, “रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार आहे. मी केवळ एका समाजासाठी नाही, तर सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी काम करेन.” तसेच, नियोजित वेळापत्रकानुसार पुढील ६ महिन्यांनंतर शुभांगी शिंदे या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
