फलटणमध्ये ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाचे भव्य आयोजन; तीन दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

राजवाडा चौक येथील श्रीराम मंदिरात शाहिरी बाणा, व्याख्यान आणि भव्य मिरवणूक सोहळा रंगणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

। लोकजागर । फलटण । २४ मार्च २०२६ ।

फलटण शहरातील राजवाडा चौक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग’ यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २४ मार्च ते गुरुवार, २६ मार्च २०२६ या कालावधीत हा उत्सव साजरा होणार असून, यादरम्यान विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी फलटणकरांना मिळणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचा आदर्श आणि शिवरायांचा देदीप्यमान इतिहास जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

उत्सवाची सुरुवात आज मंगळवार, २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये युवाशाहीर चंद्रकांत माने आणि युवाशाहिरा ऋतुजा माने आपल्या पोवाड्यांतून वीररस सादर करणार आहेत. त्यानंतर उद्या बुधवार, २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘शिवरायांचा रणसंग्राम’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुणे जिल्हा कार्यवाह मा. श्री. पराशर मोने गुरुजी हे या विषयावर मार्गदर्शन करणार असून, शिवकालीन इतिहासाचे पैलू उलगडले जाणार आहेत.

या उत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला ‘भव्य मिरवणूक सोहळा’ गुरुवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या मिरवणुकीमध्ये के. आर. साऊंड पुणे, साई लाईट फलटण, महाकाल आकर्षक देखावा आणि शिवप्रताप पेपर ब्लास्टर यांसह बाहुबली रथ विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच श्रीराम मूर्तीचे गुजरात येथील आकर्षक स्वरूप या मिरवणुकीची शोभा वाढवणार आहे. या सर्व कार्यक्रमांना फलटण परिसरातील भाविकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love