। लोकजागर । फलटण । दि. ०१ एप्रिल २०२५ ।
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे योगदान लक्षात घेऊन सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरु करुन कर्मवीरांना उच्चशिक्षण क्षेत्रातील आदरांजलीच व्यक्त केली आहे. तथापि कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमधील ‘रयत’ शब्दासह ‘कर्मवीर भाऊराव पाटील रयत विद्यापीठ, सातारा’ असे नामाभिधान करावे व त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेसह सर्वच पदाधिकार्यांनी राज्य व केंद्र शासनात ही मागणी त्वरित करावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागातील सर्व सदस्य आणि शाखाप्रमुख यांची सभा नुकतीच सातारा येथे विभागीय चेअरमन सल्लागार मंडळ संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य के. के. घाटगे, माजी सचिव डॉ. अशोक भोईटे व डॉ. जे. जी. जाधव, कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब निकम व दिनेश दाभाडे, मा. ऑडिटर शहाजी डोंगरे तसेच अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
विभागीय चेअरमन संजीव पाटील, संघटक डॉ. अनिल पाटील यांनी अनेक सदस्यांच्या आपल्या विभागातील शाळांच्या प्रश्नांबद्दल धोरणात्मक मार्गदर्शन केले. तसेच मध्य विभागातील सन 2022 – 23 व 2023 – 24 च्या शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळविलेल्या गुणवंतांचा, तसेच डी.एल.एड.मधील पहिल्या तीन विद्यार्थीनींचा यावेळी उपस्थित मान्यवरांचय हस्ते सत्कार करण्यात आला.
रयत मराठी साहित्य संमेलन व्हावे
रयत शिक्षण संस्था अंतर्गत सर्वच उच्च शिक्षण महाविद्यालयांची अनेक मराठी वार्षिक नियतकालिके प्रसिद्ध होतात. ती दर्जेदार असतात असे निदर्शनास आणून देत पुढे रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, या सर्व वार्षिक नियतकालिकांमधून अनेक विद्यार्थ्यांचे मराठी कविता, कथा, लेख, निबंध प्रकाशित होत असतात. या सर्वांनाच मार्गदर्शन, प्रोत्साहन, सादरीकरण यासाठी स्वतंत्र अशा व्यासपीठाची गरज आहे. ही साहित्यिक व सांस्कृतिक जरग लक्षात घेवून दरवर्षी वेगवेगळ ठिकाणच्या महाविद्यालय परिसरात ‘रयत मराठी साहित्य संमेलन’ संस्थेने कर्मवीर प्रबोधिनीच्या माध्यमातून आयोजित करावे. त्यातून नवोदित महाविद्यालयीन साहित्यिकांना उत्तेजन मिळेल. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे यासाठी आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही बेडकिहाळ यांनी नमूद केले.