फलटणमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; लाडकी बहीण लखपती व्हावी हीच सरकारची भावना.
। लोकजागर । फलटण । १० एप्रिल २०२६ ।
“तालुक्यातील जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळेच मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. याच माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभत असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेच्या दारी आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आणि योजनांच्या लाभासाठी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी केले.
फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित ‘तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा क्र. १) आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे अनुदान, दाखले आणि कृषी अवजारांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रश्नांची जाण: याप्रसंगी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले की, “मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांची मला पूर्ण जाण आहे. म्हणूनच मी विधानसभेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न लावून धरला आणि त्याला यश मिळवून दिले. आज युती शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान किसान योजना, डिजिटल उतारे आणि पाणंद रस्त्यांच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहेत.”
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर: शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगार, दिव्यांग आणि महिलांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ केवळ १५०० रुपयांवर न थांबता, माझी बहीण लखपती झाली पाहिजे, ही या सरकारची प्रामाणिक भावना आहे. कृषी विभागाने ४ कोटी ८९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले असून, माझ्या कार्यकाळात मी प्रत्येक खेड्यात जाऊन या योजनांची अंमलबजावणी करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती: या शिबिरासाठी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती कु. शिवांजली भोसले, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे व तुषार गुंजवटे, पोलीस उपनिरीक्षक घोरपडे मॅडम, फॉरेस्ट अधिकारी बोटकर मॅडम यांच्यासह कृषी, महसूल आणि पशू वैद्यकीय विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांना पूर्ण सहकार्य करून त्यांची कामे मार्गी लावावीत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
