फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण; समाज परिवर्तनासाठी फुले विचार अंगीकारण्याचे मान्यवरांचे आवाहन

‘पत्रकारितेतील योगदानाबद्दल विकास शिंदे व सागर चव्हाण सन्मानीत

। लोकजागर । फलटण । १४ एप्रिल २०२६ ।

राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने फलटणमध्ये विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. फलटण येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे आयोजित या सोहळ्यात वैद्यकीय, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हास्तरीय पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात डॉक्टर मयूर शिंदे (वैद्यकीय), कु. समशेर शिंदे (क्रीडा), विकास शिंदे व सागर चव्हाण (पत्रकारिता), ज.तू. गार्डे, तुकाराम कोकाटे व डॉ. अमित मोरे (साहित्य/लेखन), शुभांगी बोबडे, शशिकांत सोनवलकर व डॉ. वैशाली शिंदे (शिक्षण), किरण दंडिले (उद्योजक), अजय शेंडे (कृषी) यांच्यासह ‘फुलेंची शाळा’ टीमला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच “सत्यक्रांती दर्शन” या यूट्यूब चॅनेलवरील “फुलेंची शाळा” या लघुपटाचे प्रदर्शन आणि ‘बहुआयामी महात्मा ज्योतिबा फुले’ या हिंदी पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

गुलामगिरी संपवण्याची सुरुवात महात्मा फुलेंनी केली – संजीवराजे
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केला. “देशातील गुलामगिरी संपवण्याची खरी सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी समाज परिवर्तनाचा क्रांतीकारी मार्ग दाखवला,” असे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण नगरपालिकेच्या दोन्ही सभागृहांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव घेतल्याची माहिती दिली. तसेच शहरातील शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसवून शिक्षण आधुनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी फुले वाङ्मयाचा अभ्यास हवा – डॉ. बी. के. यादव
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांनी फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. “महात्मा फुलेंच्या विचारांचे पारायण झाल्यास समाजात अंधश्रद्धेला आणि भोंदूगिरीला जागा राहणार नाही,” असे ते म्हणाले. प्रमुख वक्ते प्रा. प्रभाकर पवार यांनी अज्ञान आणि अंधश्रद्धा हीच दुःखाची मूळ कारणे असल्याचे सांगत विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारण्यावर भर दिला. लघुपट दिग्दर्शक डॉ. अमित मोरे यांनी डॉ. यादव यांच्या प्रेरणादायी विचारसरणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्याला जिल्हा परिषद सभापती सौ. लता कर्णे, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, डॉ. जे. टी. पोळ यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि लोकमान्य उद्योग समूहाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पुढील वर्षापासून हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Spread the love