लिखाणातून समाजाला जास्तीत जास्त संदेश दिला पाहिजे : रविंद्र बेडकिहाळ

अ‍ॅड.आकाश आढाव लिखीत ‘प्रेमाच्या काठावर’ पुस्तकाचे प्रकाशन

। लोकजागर । फलटण ।

‘‘प्रेमभंग आणि प्रेमश्राफल्य यातला मेळ घालून जीवन जगलं पाहिजे आणि साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून समाजाला जास्तीत जास्त संदेश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे’’, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.

अ‍ॅड. आकाश आढाव लिखित ‘प्रेमाच्या काठावर’ पुस्तक प्रकाशन फलटण येथे त्यांच्या आई – वडिलांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य अमित मोरे होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, साहित्यिक सचिन गोसावी, युवा चित्रकार शुभांगी आटोळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र बेडकिहाळ यांनी मराठी साहित्यातील बदलणारी कादंबरी आणि वेगवेगळ्या काळात बदलणार्‍या प्रेमाच्या कथा यांचा वेध घेतला. तसेच आकाश आढाव यांनी भविष्यात आणखी ताकदीने लिखाण करावे या शुभेच्छा दिल्या तसेच साहित्यिकांना लिखाणाचा भार पेलण्यातका त्यांचा खांदा मजबूत असावा असेही नमूद केले.

प्राचार्य अमित मोरे यांनी, ‘‘वकिली किंवा इतर काम करणारी लोकं सध्या मानसिक दृष्ट्या ताणतणावात असतात त्यामुळे तणावमुक्त जगण्यासाठी एक तरी कला किंवा छंद आपण जोपासायला हवा आणि ही गोष्ट आमचे माजी विद्यार्थी आकाश आढाव यांचेकडून शिकावी. त्यांच्या लिखाणात एक नैसर्गिक भाव पाहायला मिळतो आणि महाविद्यालयाला नेहमीच त्यांचा अभिमान आहे’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. रमेश आढाव म्हणाले, ‘‘साहित्य निर्माण हे वाचन, मनन, चिंतन आणि व्यासंगतून होत असतं आणि प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या भावना त्यात उतरल्या पाहिजेत. आज लोकशाहीच्या चारही स्तंभाने मजबूत होऊन आपली भूमिका पार पाडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.’’

साहित्यिक सचिन गोसावी यांनी, लेखक अ‍ॅड. आकाश आढाव यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विषद करुन लिखाणाच्या वैशिष्ट्यावर प्रकाशझोत टाकला. मोठ्या धाडसाने वास्तविक परिस्तिथीवर आधारीत असणारी ही कादंबरी आकाशभाऊंच्या प्रचंड जनसंपर्काच्या बळावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लेखक आकाश आढाव म्हणाले की, ‘‘यामागे माझी सात वर्षांची मेहनत आहे आणि ती मी वाया जाऊ देणार नाही. गेल्या सात वर्षांत या विषयाचा अभ्यास करून साध्या सरळ आणि वास्तव भाषेत लिखाण करुन मी व्यक्त झालो आहे आणि ही कादंबरी आपण एका बैठकीत वाचून पूर्ण कराल असा विश्‍वास वाटतो. माझं लिखाण माझे वाचकांनी स्विकारून प्रतिक्रिया द्याव्यात’’, असे आवाहन केले.

शांत, सयंमी, प्रत्यक्ष कमी बोलणारे आकाश आढाव हे तेवढ्याच प्रखरतेने, स्पष्टपणे लिखाण करत असतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या पोस्ट सुद्धा बरंच काही सांगत असतात. स्वतः शिक्षण घेत असताना अनेक कष्टाची कामे त्यांनी केली आहेत. दुसर्‍यांच्या वेदनेने स्वतःचं मन घायाळ करणारे आणि देण्यासाठी स्वतःजवळ काही असेल ते निस्वार्थीपणे देत असतात. त्यानीं लिहिलेली कादंबरी प्रेमाच्या काठावर या पुस्तकास मराठी वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल’’, अशा सदिच्छा युवा पत्रकार सागर चव्हाण यांनी दिल्या.

चित्रकार शुभांगी आटोळे यांनी मुखपृष्ठ साकारतानाचे अनुभव कथन करुन मिळालेल्या संधीबद्दल आभार मानले. ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर कवी सागर कुंभार आणि युवा कवी गुड्डाराज नामदास यांनीही आपल्या खास शैलीत शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास सौ. प्रमिला चव्हाण, हेमंत कडाळे, प्रशांत कांबळे, कवी किरण अहिवळे, कवी प्रकाश कोडलकर, अ‍ॅड. जयवंत काकडे, अ‍ॅड. शुभम नलवडे तसेच कायद्याचे विद्यार्थी कला साहित्य सामजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. नवनाथ कोलवडकर यांनी केले. प्रास्ताविक अ‍ॅड. रमजान मुल्ला यांनी केले तर आभार प्रा. श्रेयस कांबळे यांनी मानले.

Spread the love