डॉ.विठ्ठल ठोंबरे जनसामान्याच्या काळजाचा ठाव घेणारे साहित्यिक होते : प्रा.रवींद्र कोकरे

। लोकजागर । फलटण ।

मराठी साहित्यात कुलदैवत खंडोबाचे संशोधन करून आपले नाव सातासमुद्रा पलीकडे अजरामर करणारे दुधेबावीचे डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे खरे अस्सल मातीतील साहित्यिक होते.त्यांच्या साहित्यातून लोक संस्कृती, लोकसाहित्य, लोककला यांचं पदोपदी दर्शन घडते. जनसामान्याच्या काळजाचा ठाव घेणारे साहित्यिक म्हणून त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे. त्यांच्या नावाने अभ्यासिका, समृद्ध ग्रंथालया बरोबर साहित्यिकांना प्रेरणा देणारे कार्यक्रम होणार आहेत’’, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार संमेलन अध्यक्ष प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.

पहिले राज्यस्तरीय स्वर्गीय डॉ . विठ्ठल बापूजी ठोंबरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या विचार पिठावरून कोकरे बोलत होते. संमेलन उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मारोतराव वाघमोडे यांनी ठोंबरे यांचा जीवन प्रवास उलगडला. प्रमुख अतिथी रघुराज मेटकरी, बा. ग. केसकर, ह.भ.प. आप्पा निकम उपस्थित होते. साहित्यिक विठ्ठल ठोंबरे यांच्या साहित्यकृतीचे पूजन व वृक्षरोपणाने संमेलनास सुरुवात झाली.
यावेळी परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये राजेंद्र बरकडे, हरिभाऊ कोळेकर , शशिकांत सोनवलकर, प्रकाश सस्ते, राजेंद्र आगवणे, आधिका माने, अंकुश शिंदे, आशा दळवी या साहित्यिकांनी स्वर्गीय विठ्ठल ठोंबरे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल गौरव उद्गार काढले .

कवी संमेलन ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यामध्ये कवी धनंजय सोनलकर, डॉ. गोविंद काळे, हनुमंत चांदगुडे, पोपट वाबळे, बाबासाहेब कोकरे, दामिनी ठिगळे, युवराज खलाटे, अविनाश चव्हाण यांनी शेती – माती – नाती – संस्कृती यावरील काव्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

या संमेलनाचा समरोप हणमंत सोनवलकर, विलास पडवळ, नारायण राव वळकुंदे, कुमार रुपनवर, दत्तात्रय काळे, नूतन भैया तावरे, गणेश गवळी, ताराचंद आगवणे, शिवमूर्ती लोखंडे, महेंद्र पिंगळे, मोहन डांगे, ढोणे गुरुजी यांच्या वैचारिक मार्गदर्शनाने झाला. महाराष्ट्रातील साहित्य प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

संमेलन यशस्वी करण्यासाठी दादा झंजे, प्रकाश कोळपे, बाळकृष्ण दडस, सोमनाथ लोखंडे यांनी संमेलन संयोजन व विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन लोखंडे यांनी मानले.

Spread the love