। लोकजागर । फलटण ।
साहित्य क्षेत्रातील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण साहित्य अकादमी सुरु करुन मराठी भाषेच्या सर्व शासकीय संस्था या अकादमीच्या नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष व मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, रविंद्र बर्गे, प्रा. विक्रम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यासाठी नवमहाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी तत्कालीन राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ, लोकसाहित्य समिती, मराठी भाषा विभाग, रंगभूमी परीक्षण मंडळ, स्थापन केले. राज्यातील विभागीय साहित्य परिषदांचे एकत्रीकरण करुन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापनेसाठी सहकार्य केले. या संस्थांना अनुदान सुरु करुन मराठी ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजनाही सुरु केल्याचे यावेळी रविंद्र बेडकिहाळ यांनी निदर्शनास आणून दिले.
यशवंतराव चव्हाण राजकारणाशिवाय एक उत्तम रसिक, वाचक, लेखक व कवी मनाचे होते. त्यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र एका वेगळ्याच प्रांजळ शैलीने लिहिले आहे, पण मराठी साहित्य विश्वाने त्याची दखल घेतली नाही. अनेक पुरस्कार मोठ्या मोठ्या मान्यवरांना मरणोत्तर दिले जातात त्याप्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मराठी भाषा, साहित्य संस्कृती आणि साहित्य लेखनातील योगदान लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक व रसिक व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या साहित्यावर आजही चर्चासत्रे झाली पाहिजेत यातून नव्या पिढीला मार्गदर्शन मिळेल. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा आजच्या राज्यकर्त्यांनी जपला तर पुन्हा एकदा सुसंस्कृत व प्रगत महाराष्ट्र अनुभवता येईल. येथील मसाप शाखेच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी पासून साहित्यिक कृतज्ञता म्हणून फलटणमध्ये गेली १२ वर्षे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यासाठी आमचे सर्व सहकार्य कायमच राहील.
मसाप फलटण तर्फे दरवर्षी होणारे यशंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीमुळे दि. २५ नोव्हेंबरला होऊ शकले नाही, तथापि आता नजिकच्या काळात हे संमेलन घेतले जाईल. यंदाच्या संमेलनाचा केंद्रबिंदू शिक्षण विषयक असल्यामुळे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीनिमित्त फलटण तालुक्यातील शिक्षकांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे यांनी यावेळी दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार आजही आवश्यक वाटतो यातच यशवंतरावांच्या कार्य कर्तृत्वाचे महत्व लक्षात येते. स्व. यशवंतराव यांचे सुसंस्कृत राजकारणाचे बोट महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सोडल्याची जाणीव प्रत्येकाला होत असल्याचे मत प्राचार्य शांताराम आवटे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी मसाप कार्यवाह अमर शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कार्यक्रमाबाबत विवेचन केले, समारोप व आभार सदस्य मनीष निंबाळकर यांनी मानले.
कार्यक्रमास मसाप फलटण शाखा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.