। लोकजागर संपादकीय ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या निवडणूकीत राज्यपातळीवर प्रामुख्याने भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अ.प.) यांची ‘महायुती’ विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उ.ठा.), राष्ट्रवादी (श.प.) यांची ‘महाविकास आघाडी’ अशा झालेल्या लढाईत सर्वांच्या कल्पनेपलिकडचे अभूतपूर्व यश ‘महायुती’ ला मिळाले आहे. सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत हे यश इतके बलाढ्य आहे की या निकालावर अनेक राजकीय बड्या नेत्यांपासून ते असंख्य सर्वसामान्य मतदारांपर्यंत कुणाचाच विश्वास अजूनतरी बसलेला नाहीये. असो; ज्याप्रमाणे राज्यात अभूतपूर्व निकाल लागलेला आहे तसाच अभूतपूर्व निकाल आपल्या फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात देखील लागला आहे. इथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात काम करणारे हॅट्रीक आमदार दीपक चव्हाण यांचा तब्बल 17 हजार 46 इतक्या मताधिक्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात सचिन पाटील यांनी पराभव केला आहे. एकीकडे गेली सलग 25 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवार निवडून येण्याची इथली परंपरा अबाधित राहिली असली तरी दुसरीकडे सलग 30 वर्षांपासूनचा सत्ताधारी गट आणि सलग 15 वर्षांपासूनचे आमदार यामध्ये फलटणला परिवर्तन घडले असल्याने ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अशी परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे.
तालुक्याच्या राजकारणाचे सर्वोच्च केंद्र असलेल्या आमदारकीची सत्ता गेली सलग 30 वर्षे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात राजे गटाकडे होती. सन 1995 साली श्रीमंत रामराजे हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून व त्यानंतर 1999 व 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून आमदार झाले. त्यानंतर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावर श्रीमंत रामराजेंच्याच नेतृत्त्वात 2009, 2014, 2019 अशा सलग तीन टर्म राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर दीपक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले होते. यंदा 2024 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी मात्र या मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली. राजकीय हवेचा अंदाज घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वगळता तत्कालीन आमदार दीपक चव्हाण व संपूर्ण राजे गट अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाला. विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या नेतृत्त्वात लढवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता आणि त्याप्रमाणे दीपक चव्हाण यांना उमेदवारीही मिळाली. दुसरीकडे लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले पण त्यावेळी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ‘मतदारसंघात आपल्याला मानणारे मतदार वाढले आहेत आणि मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत आहे’ हे ओळखून होते. त्यामुळे ‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक संघर्षात कमी पडायचं नाही’ असं ठरवून त्यांनी सचिन पाटील यांच्या रुपाने नवीन चेहरा उमेदवार म्हणून पुढे आणला. महायुतीच्या जागा वाटपात फलटणची जागा भाजपला मिळावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केला. यात त्यांना यश आले नसले तरी ‘महायुतीतील पक्ष कोणताही असो उमेदवार मात्र आपण सांगू तोच असेल’ हे करण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वात त्यांनी सचिन पाटील यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले.
‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ अशी लढत निश्चित झाल्यानंतर राजेगट आणि खासदार गट या दोघांच्याही प्रचार यंत्रणेने वेग घेतला. दीपक चव्हाण यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात खा.शरद पवार, खा.डॉ.अमोल कोल्हे या दिग्गजांच्या सभा झाल्या. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजघराण्यातील पुढच्या पिढीनेही महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांना सोबत घेऊन जोरदार प्रचार केला. श्रीमंत रामराजे यांनी तालुक्यासाठी काय कष्ट घेतले आहेत हे प्रत्येकाने मतदारांना सांगितले. पण पक्षांतराच्या प्रक्रियेत ‘अदृष्य’ राहिलेले श्रीमंत रामराजे हे जाहीर प्रचारातही ‘अदृष्य’च राहिले. त्यामुळे प्रचाराचा प्रभाव तितकासा पडला नाही.
दुसरीकडे सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी माणचे आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर ही नेते मंडळी मतदारसंघात कष्ट घेत होतीच पण स्वत: अजितदादा पवार यांनी मतदारसंघात घेतलेल्या तीन जाहीर सभा विशेष प्रभावी ठरल्या. अजितदादांच्या सभांमुळे इतकी वर्षे केवळ तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर गाजणारी निवडणूक यंदा मुलभूत सुविधा, रोजगार, कारखानदारी, सहकारी संस्था, उद्योग धंदे, आरोग्य सुविधा, मैदाने, बगिचे अशा इतरही प्रश्नांवर गाजली. ‘विकासाच्या बाबतीत बारामतीच्या तुलनेत फलटण मागे आहे’ ही फलटणकरांच्या मनात खूप वर्षांपासूनची खंत होतीच आणि नेमके त्याच मुद्यावर अजित पवारांनी बोट ठेवले. यातून मतदारांमध्ये नेतृत्त्व बदलाची जाणीव तीव्र झाली असणार यात शंका नाही.
शेवटचा मुद्दा :
‘महायुती’ सरकारने सुरु केलेल्या आर्थिक लाभाच्या योजना, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धडाडीने तालुक्यात आणलेली विकासकामे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांनी फलटणकरांना केलेला ‘विकासाचा वादा’ यामुळे निकालाअंती फलटणच्या मतदारांचा कौल सत्तापरिवर्तनाच्या बाजूने आला आहे. मतदारांनी खा.शरद पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्त्व नाकारत अजितदादा पवार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून एका अर्थाने ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे सूत्र स्विकारले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून या दोन्हीही नेतृत्त्वांनी तालुक्याला विकासाची ‘नवी वेळ’ खर्या अर्थाने दाखवून द्यावी. जनेतेने विकासासाठी तालुक्याच्या ‘नेतृत्त्वाचा चेहरा’ बदलला आहे आता त्यांनी विकासाच्याबाबतीत ‘तालुक्याचा चेहरा’ बदलून दाखवावा एवढीच अपेक्षा !
- रोहित वाकडे, संपादक, लोकजागर, फलटण.