| लोकजागर | नवी दिल्ली | दि. १६ जानेवारी २०२५ |
स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन आज नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप्समध्ये केल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. शासकीय पातळीवर स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्याचा भारत हा गतिमान, आत्मविश्वास असलेला आणि भविष्यासाठी सज्ज असल्याचं स्टार्टअप इंडियाच्या यशातून दिसून येते असेही ते म्हणाले. “स्टार्टअपमधल्या प्रत्येक युवकाची मी प्रशंसा करतो आणि अधिकाधिक युवकांनी स्टार्टअपकडे वळावे असं आवाहन करतो. तुम्ही निराश होणार नाही याची ग्वाही मी देतो.” असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X वरच्या संदेशात म्हटले आहे:
“आज आपण स्टार्टअप इंडियाची नऊ वर्ष साजरी करत आहोत.या महत्त्वाच्या उपक्रमाने नवकल्पना,व्यावसायिकता आणि विकासाची नव्याने व्याख्या केली गेली आहे.हा माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेला उपक्रम आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम म्हणजे एक शक्तिशाली मार्ग आहे. गेल्या नऊ वर्षांत या उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केलं आणि त्यांच्या नवकल्पनांचे रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये केले.”