प्रेरक कार्याचे चिरंतन स्मरण

। लोकजागर । लक्षवेध ।

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्या दिवशी अर्थात 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्रसृष्टीची पायाभरणी केली. त्यामुळे आजचा दिवस राज्यातील नव्हे तर देशभरातील तमाम मराठी पत्रकारांसाठी गौरवास्पद आहे. 20 फेब्रवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना अवघ्या 34 वर्षांचे अल्पायुष्य लाभले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असलेल्या पोंभुर्ले गावचा हा कोकणच्या मातीतला सुपुत्र सन 1825 मध्ये मुंबईत गेला. तिथे जावून आपल्या विद्वत्तेच्या जोरावर शिक्षण, सामाजिक, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, धर्मचिकित्सा आणि पत्रकारितेतून समाजजागरण अशा बहुआयामी कर्तृत्त्वाची छाप उमटवण्यात ते यशस्वी ठरले. अशा या प्रेरक कार्याचे आणि या कार्याचे चिरंतन स्मरण करणार्‍या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेविषयी आजच्या पत्रकार दिनानिमित्त घेतलेला हा धावता आढावा.

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म जरी ब्राह्मण कुटुंबात झाला असला व ते स्वधर्मावर म्हणजे हिंदू धर्मावर प्रेम करणारे असले तरी ते धर्मवेडे नव्हते. धार्मिकदृष्ट्या ते अस्तिक आणि सदाचारसंपन्न हिंदुधर्माभिमानी होते. मात्र असे असूनही धार्मिक आणि सामाजिक सुधारणां प्रकरणी ते सुधारक व व्यवहारवादी वृत्तीचे होते. निष्ठावंत पहिले समाज प्रबोधनकार व सुधारक असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. आपल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या व त्याचबरोबर ‘दिग्दर्शन’ या मराठी मासिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणेचे कार्य तर केलेच त्याचबरोबर बहुविध क्षेत्रात त्यांनी दूरगामी कार्य केलेले आहे. आचार्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून 1840 मध्ये त्यांना त्या काळातील अत्यंत बहुमानाच्या ‘जस्टिस ऑफ दि पीस’ या पदावर नेमून गौरव करण्यात आला. याशिवाय दि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे 1830 मध्ये डेप्युटी नेटीव्ह सेक्रेटरी म्हणून तर पुढे 1832 पासून पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ चे संस्थापक (6 जानेवारी 1832) व मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक (1 मे 1840) म्हणून मराठी वृत्तपत्रसृष्टीचे ते जनक ठरतात. पहिले असिस्टंट प्रोफेसर (नोव्हेंबर 1834), ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (सन 1845), नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपीठाचे संस्थापक, पहिले मराठी शाळा तपासणीस (पहिले शिक्षणाधिकारी) (सन 1844 ते 1855), पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक (1845), पहिल्या अध्यापक वर्गाचे संचालक (यावरून आजच्या डी.एड. व बी.एड. कॉलेजची संकल्पना त्याकाळात आचार्यांनी मांडल्याचे लक्षात येते) (सन 1845), ‘ज्ञानेश्‍वरी’ चे शिळाप्रेसवर पहिले मुद्रण व प्रकाशन अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील पहिलेपण बाळशास्त्रींकडे जाते. याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो.

अशा या प्रेरक कार्याचे चिरंतन स्मरण करण्याचे कार्य गेल्या 37 वर्षापासून फलटण (जि.सातारा) येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ करीत आहेत; याची देखील आजच्या दिवशी दखल घेणे क्रमप्राप्त आहे. बाळशास्त्रींची जन्मभूमी पोंभुर्ले येथे त्यांचे देशातील पहिले – वहिले स्मारक उभारण्याचे ऐतिहासिक व अभिमानास्पद काम या संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. सन 1994 पासूनचा या स्मारक उभारणीचा प्रवास थक्क करणारा आहे. सद्यस्थितीत येथील स्मारक प्रकल्पात ‘दर्पण’ सभागृह, बाळशास्त्रींचा अर्धपुतळा, बाळशास्त्रींच्या कार्यकर्तृत्त्वाची माहिती सांगणारे डिजीटल फलक आदींचा समावेश आहे. संस्थेतर्फे प्रतिवर्षी या ठिकाणी 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिन, दर्पण पुरस्कार वितरण, 20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती, 17 मे रोजी बाळशास्त्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. याचबरोबर बाळशास्त्रींचे चरित्र प्रकाशन, कर्मभूमी मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे प्रथमच तैलचित्र अनावरण, केंद्र शासनामार्फत त्यांच्यावर पहिल्या टपाल लिफाफ्याचे प्रकाशन, बाळशास्त्रींना जयंतीदिनी शासकीय पातळीवरुन अभिवादन, 6 जानेवारी रोजी सर्व वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे शासकीय अभिवादन अशा एक ना अनेक प्रकारे बाळशास्त्रींचे स्मरण या संस्थेमार्फत सुरु असल्यानेच बाळशास्त्रींचे कार्य सातत्याने समाजासमोर येत आहे हे देखील मान्य करावेच लागेल. याशिवाय विशेष म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचे समग्र चरित्र नव्या पिढीसमोर यावे म्हणून रविंद्र बेडकिहाळ यांनी बाळशास्त्रींचे समग्र चरित्र तीन खंडांमध्ये लिहून राज्यशासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे सुपूर्द केले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. एव्हढे करुन रविंद्र बेडकिहाळ थांबत नाहीत तर राज्यशासनाने मुंबई या बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्मभूमीत त्यांच्या कर्तृत्त्वाला साजेसे असे स्मारक उभारावे यासाठी ते वयाच्या 80 व्या वर्षीही कार्यरत आहेत. बाळशास्त्रींच्या प्रेरक कार्याचे सुरु असलेले हे चिरंतन स्मरण तमाम मराठी पत्रकारांना अनुकरणीय असेच आहे.

रोहित वाकडे, संपादक : लोकजागर, फलटण.

Spread the love