। लोकजागर । फलटण । दि. ०८ फेब्रुवारी २०२५ ।
गोविंद मिल्कचे प्रमुख तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या तपासणीच्या कारवाईचा आज चौथा दिवस आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवासस्थानाबाहेर आजही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. दरम्यान; याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांशी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तपासणी आज संपेल कां? असं विचारले असता, ‘‘सुदैवाने आज संपेल. थोडं पेपर वर्क बाकी आहे’’, असे म्हणत कारवाई आज संपण्याचे संकेत श्रीमंत सत्यजीतराजे यांनी दिले.
दरम्यान, श्रीमंत सत्यजीतराजे यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कार्यकर्त्यांचा आधार वाटला : श्रीमंत सत्यजीतराजे
‘‘प्रवासातून इकडं येताना थोडं टेन्शन आलं होतं. मात्र बातम्यांमधून तुम्ही सगळे इथे जमले असल्याचे बघून आधार वाटला.’’, असे सांगून ‘‘इथं सगळं सुरळीत सुरु आहे. तुम्हीही आता सर्वजण आपापल्या स्वत:च्या कामकाजाकडे लक्ष द्या’’, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.