। लोकजागर । फलटण । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामुळे गेले काही दिवस चर्चेत असणार्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सलग पाच दिवसांची कारवाई काल रात्री संपल्यानंतर लगेच तीन कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यामुळे सर्वचजण अवाक झाले. श्रीमंत संजीवराजे यांच्या या ‘अॅक्टीव्हनेस’ची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होताना पहायला मिळाले.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ‘गोविंद मिल्क कंपनी’चे प्रमुख श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून सलग पाच दिवस तपासणीची कारवाई करण्यात आली. या पाच दिवसात श्रीमंत संजीवराजे आपल्या कुटूंबियांसमवेत फलटण येथील ‘सरोज व्हिला’ या निवासस्थानातच होते. सलग पाच दिवसाच्या या कारवाईत संबंधित विभागाला कोणताही बेकायदेशीर व्यवहार आढळून आला नाही. कारवाई संपताच या संपूर्ण कारवाईबाबतची संक्षिप्त माहिती श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांना दिली आणि त्यानंतर लगेचच फलटण शहरातील विविध ठिकाणच्या तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी देखील लावली. त्यामुळे इतक्या लांबलचक तपासणीच्या कारवाईनंतरही थकून न जाता श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यक्रमांना लावलेली उपस्थिती सर्वांसाठी लक्षवेधक ठरली.
श्रीमंत संजीवराजे यांनी उपस्थिती लावलेल्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांचा वाढदिवस कार्यक्रम, मुधोजी क्लब येथील बॅडमिंटन स्पर्धा आणि एका विवाह सोहळ्यानिमित्तच्या स्वागत समारंभाचा समावेश होता.