मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये नाना शंकरशेट यांच्या तैलचित्राचे अनावरण

। लोकजागर । मुंबई । दि. ११ फेब्रुवारी २०२५ ।

मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत बहुमोल योगदान होते. नाना शंकरशेट यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून या महाविद्यालयात त्यांच्या २२२ व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य तैलचित्र अनावरणाचा सोहळा सोमवार, दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला.

सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश सोनावणे यांनी साकारलेल्या या तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे कला संचालक डॉ.संतोष क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कुलसचिव शशिकांत काकडे, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, शिल्पकार विजय बुर्‍हाडे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर आदींसह प्रतिष्ठान आणि परिषदेचे पदाधिकारी, शंकरशेट कुटुंबीय, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईसह देशभरातील कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जमशेदजी जीजीभाई यांनी कला महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला नामदार नाना शंकरशेट यांनी पाठींबा देत या महाविद्यालयासाठी 18 व्या शतकात भरघोस निधी दिला होता. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे शिक्षणाचे मोठे दालन उघडे झाले. नानांच्या या कार्याला उजाळा म्हणून या ठिकाणी या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे. याकामी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अ‍ॅड.मनमोहन चोणकर व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा केला.

Spread the love