व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समाजाला पटवून देणे गरजेचे : ह.भ.प.बंडातात्या कराडकर

संवाद मेळाव्यात सहभागी झालेले व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रसह अन्य संस्थांचे प्रमुख आणि इतर.

पिंप्रद येथे विविध व्यसनमुक्ती संस्थांचा संवाद मेळावा संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेतून युवकांचे होणारे नुकसान कदापीही भरुन न येणारे आहे. त्याबाबत संघटीत शक्ती निर्माण करुन याचे गंभीर परिणाम शासन व समाजाला पटवून दिले पाहिजेत’’, अशी अपेक्षा युवकमित्र संतवीर ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.

पिंप्रद ता.फलटण येथील राज्यस्तरीय मध्यवर्ती कार्यालय परिसरातील राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित गुरुकुल येथे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या कार्यात काम करणार्‍या महाराष्ट्रातील विविध संस्था प्रमुखांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ह.भ.प. बंडातात्या कराडकर बोलत होते. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष दिपक जाधव अध्यक्षस्थानी होते, तर संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह ताराचंद सेवा ट्रस्ट, पुणेच्या सुजाता दिवाण, झुंबरराव खराडे (पुणे), डॉ. ज्ञानेश्वर खराडे (फलटण), दिव्यस्पर्श क्लिनिक व निसर्गोपचार केंद्र रिधोरे ता.माढाचे डॉ.कुमार गायकवाड व डॉ.श्वेता सिंग, अल्कोहोलिक्स नानिमस पंढरपूरचे पदाधिकारी, डॉ.साधना व राजाराम पाटील (बत्तीस शिराळा), परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे किशोर काळोखे उपस्थित होते.

‘‘शासन व्यसनमुक्तीबद्दल उदासीन असून दररोज नवनवीन अध्यादेश काढून दारुसह व्यसनी पदार्थ सहज कसे उपलब्ध होतील या साठी प्रयत्नशील आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्ती कार्यात सहभागी झालेल्या संस्थानी समरसता साधली तर राज्यात व देशात होणार्‍या युवकांच्या व्यसनाधिनतेच्या प्रमाणात निश्चित घट होईल’’, असा विश्वास
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

‘चला एकत्र येऊ, व्यसनमुक्त राष्ट्र घडवू’ या उपक्रमांतर्गत दोन सत्रात या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून सहभागी झालेल्या अनेक संस्थांनी आपल्या कार्याची दिशा व उद्दिष्टे मनोगतातून युवकांच्या समोर मांडली. तसेच येणार्‍या काळातील व्यसनाची दाहकता कशी वाढते आहे, यावर उपाय योजना कशा पद्धतीने करावी याबद्दल चर्चा केली. सर्वसामान्य व्यक्ती व शालेय विद्यार्थी यांना व्यसना पासून कसे परावृत्त करुन निरोगी जीवनाची वाटचाल करता येईल यावर बर्‍याच संघटनानी भर दिला.

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी, ‘‘सर्व संस्थानी मिळून कार्य केले तर व्यसनांना हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही’’, हे स्पष्ट करताना, ‘‘मात्र आपले काम हे प्रवाहाच्या विरोधात असुन कायम संघर्ष करावाच लागेल. त्यासाठी संघटीत शक्तिद्वारे या प्रश्नाचे गांभीर्य समाज व शासनापर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे’’, हे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी उपस्थितांना पटवून दिले.

जगन्नाथ शिंदे यांनी संवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष दिपक जाधव यांनी आभार मानले.

यावेळी नंदकुमार जगताप, विजय लावंड, प्रिन्स पासवान, जितेंद्र फडतरे, महादेव यादव, दत्तात्रय सस्ते, प्रा. धनंजय देशमुख, भानुदास वैरट, बाळासाहेब निकम, गणेश जगदाळे, बाळासाहेब कासारे, प्रमोद शिंदे, बलभीम गायकवाड, आबा हुंबे, शरद रायते, कैलास वाघळकर यांच्यासह राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुलचे विद्यार्थी उपास्थित होते.

Spread the love