नीरा उजवा व डावा कालव्याचे आवर्तन आज ठरणार; आ.श्रीमंत रामराजे घेणार ठोस भूमिका

। लोकजागर । फलटण । दि. ०१ मार्च २०२५ ।

उन्हाळा हंगाम २०२४ – २५ साठीच्या सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी ४ : ०० वाजता पुणे येथील कौन्सील हॉल सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून यामध्ये नीरा उजवा व डावा कालव्याचे आवर्तन निश्‍चित केले जाणार आहे. या बैठकीत फलटणच्या पाण्याबाबत आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ठोस भूमिका घेणार असल्याने आजच्या बैठकीककडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागले आहे.

खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा या पाच प्रकल्पांमधील पाण्याच्या नियोजनासाठी ही बैठक पार पडणार आहे.

नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आर्वतनात वाढीव पाण्याची मागणी माळशिरस व सांगोला तालुक्यातून करण्यात आली आहे. मात्र नीरा उजवा कालव्याच्या पाणी वाटपासंदर्भात प्रथेप्रमाणे पाणी वाटप व्हावे. नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी मिळावे. नवीन पाणी वाटपाचे धोरण ठरवून फलटण – खंडाळा तालुक्याच्या हक्काचे पाणी इतर तालुक्यात देवू नये, याबाबत ठोस भूमिका आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या बैठकीत मांडणार आहेत. पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा झाल्यानंतर संभाव्य शिल्लक पाण्यावरही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा अधिकार आहे. त्यामुळे निरा खोर्‍यातील पाणी वाढवा आणि मग अन्यत्र पाणी वाटप करा, अशीही प्रमुख मागणी आ. श्रीमंत रामराजे यांची राहणार असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले आहे.

मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी पुण्यात धडकणार

दरम्यान, पाणी वाटपातील संभाव्य बदल झाल्यास फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येईल. परिणामी तालुक्यातील साखर कारखानदारीलाही फटका बसेल. आपल्या हक्काचे पाणी कमी झाल्यास शेतकर्‍यांना केवळ ज्वारी, बाजरीची पिके घ्यावी लागतील. त्यामुळे पाण्याच्या प्रश्‍नावर जागृत राहून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पाण्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात तालुक्यातील शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने आज पुणे येथे धडकणार आहेत. पाणी वाटपाबरोबरच संबंधित विभागाकडून आकारण्यात आलेल्या वाढीव पाणी पट्टीच्याबाबतही तालुक्यातील शेतकरी आवाज उठवणार आहेत.

Spread the love