। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।
सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने फलटण – गिरवी रस्त्यावर झिरपवाडी गावच्या हद्दीत १९९२ मध्ये तब्बल ८० लाख रुपये खर्चून बांधलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत आज अखेर वापराविना पडून आहे.जिल्ह्याला चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. अशा स्थितीत गेली ३० वर्षे बंद अवस्थेत असणार्या फलटण तालुक्यातील झिरपवाडी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न कधी मार्गी लागणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केला आहे.
झिरवाडी येथील ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून गेली तीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. निवेदन दिली. पाठपुरावा केला. परंतु यश आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून दादही मागितली आहे. न्यायालय योग्य निर्णय देईलच परंतु महायुतीच्या राज्य मंत्रीमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री तसेच जिल्ह्यात जवळपास सर्वच आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे त्यांनी लक्ष घातल्यास या ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न त्वरित मार्गी लागेल अशी अपेक्षा दशरथ फुले यांनी व्यक्त केली आहे

रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नसल्याच्या त्यावेळच्या पार्श्वभूमीवर सन 1997 मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी.अलेक्झांडर फलटण दौर्यावर आले असता सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व त्यांच्या सहकार्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सदर रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देत ते तातडीने सुरु करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सदर ग्रामीण रुग्णालय सुरु झाले. मात्र ते कसेबसे दोन वर्षे सुरू राहिले.त्यानंतर आज अखेर ते बंद अवस्थेत आहे. सद्यस्थितीत दुरावस्थेत ही बंद पडलेली इमारत उभी आहे.
२५ मार्च १९८६ साली सदर रुग्णालय सुरू करण्याचा शासन निर्णय झाला होता. त्यावेळी गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील,या दृष्टिकोनातून या ग्रामीण रुग्णालयासाठी झिरपवाडी येथील काही शेतकर्यांनी आपली आठ एकर जागा बक्षिसपत्राद्वारे दान केली होती. आजमितीस या जागेची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे.त्यामुळे ज्या उद्देशासाठी आम्ही जागा दान केली आहे, त्याचा विनियोग शासन करीत नसेल तर आमच्या जमिनी परत कराव्यात अशीही मागणी संबंधित शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील मंत्रीमंडळात असणारे चार मंत्री,सर्व आमदार यांनी लक्ष घालून गेली तीस वर्षे बंद असणारे झिरपवाडी येथील ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.