वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे : प्राचार्य नामदेव बिजले

लोणंदच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

। लोकजागर । फलटण । दि. ०८ मार्च २०२५ ।

‘‘सर सी. व्ही. रमण हे भारतीय वैज्ञानिक होते. त्यांनी ‘रमण इफेक्ट’ चा दि. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी शोध लावला. त्यांच्या या संशोधनाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. ज्या संशोधनाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जाते अशा संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वळणे आवश्यक आहे’’, असे मत समता ज्युनिअर कॉलेज आणि आश्रम शाळा पाडेगावचे प्राचार्य नामदेव बिजले यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायन्स असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बिजले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा. संजय डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना, ‘‘२८ फेब्रुवारी या दिवशी ‘रमण इफेक्ट’ चा शोध लागल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो’’, असेही प्राचार्य बिजले यांनी सांगितले.

‘‘ नॅनो तंत्रज्ञान हे आज जगामध्ये सर्वत्र वापरले जात आहे. याचा पूर्वीच्या वैज्ञानिकांनी पाया घातला आहे. आयुर्वेदामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर होत असून या तंत्रज्ञानाचा उपयोग आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. तरच आपण जगाच्या बरोबरीने संशोधनामध्ये जाऊ’’, असे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सांगितले.

यावेळी महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्नो रांगोळी, फ्लॉवर रेंजमेंट, मॉडेल प्रेझेंटेशन, क्वीज कॉम्पिटिशन हे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून मालोजीराजे ज्युनियर कॉलेज लोणंद येथील सौ. व्ही. व्ही. मोहिते, प्रा. सौ. जे. एस. बर्गे तसेच न्यू इंग्लिश स्कूल लोणंदच्या प्रा. सौ. एस. टी. ननावरे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत मालोजीराजे जुनिअर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मुलींचे, लोणंद येथील ५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना रोख प्रथम १००१, द्वितीय ७०१, तृतीय ५०१ रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय डांगे यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. एस. गायकवाड यांनी केले. मान्यवरांचे आभार सायन्स असोसिएशनचे सदस्य डॉ. स्वप्निल बनकर यांनी मानले.

Spread the love