जागतिक महिला दिनी फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा सभा संपन्न

फलटण पंचायत समितीत पार पडला तालुकास्तरीय महिला मेळावा

। लोकजागर । फलटण । दि. ०९ मार्च २०२५ ।

जागतिक महिला दिनानिमित्त फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा संपन्न झाली. तर फलटण पंचायत समितीमध्ये तालुकास्तरीय महिला मेळावा संपन्न झाला.

महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते.

सदर ग्रामसभेमध्ये गावपातळीवरील सर्व महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, बचतगटाच्या सदस्य महिला यांचे सहकार्य घेऊन ग्रामसभेत उपस्थित महिलांना महिलांचे हक्क व महिलांसाठी सुरु असलेल्या योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दरम्यान, सदर विशेष ग्रामसभेदरम्यान उत्कृष्ट काम करणार्‍या महिलांना ग्रामपंचायतींच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

फलटण पंचायत समितीत तालुकास्तरीय महिला मेळावा संपन्न

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण पंचायत समितीमध्ये तालुक्यातील महिला सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी हरघर नळ योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणार्‍या 27 महिला सरपंचांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. महिलांना दैनंदिन कामकाजामध्ये येणारा ताणतणाव निवारणासाठी सेवानिवृत्त प्राचार्य रविंद्र येवले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यावेळी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन पंचायत समितीतील महिला कर्मचारी अर्चना घोगरे, किर्दक, वाघमोडे, बचत गटाच्या प्रमुख संजना आटोळे यांनी केले.

Spread the love