विश्वासराव भोसले यांच्या कायदेशीर लढाईला सर्वतोपरी सहकार्य करणार
। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
‘‘श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रशासक नेमून पारदर्शक पद्धतीने व्हावी ही सगळ्या सभासदांची इच्छा आहे. मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आम्ही सुरु केलेली लढाई आता कोर्टात गेलेली आहे. ही कायदेशीर लढाई विश्वासराव भोसले व अॅड. नरसिंह निकम लढणार आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य आम्ही करणार आहोत’’, अशी भूमिका माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली.

बहुचर्चित श्रीराम सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळ निवडणूक राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून पुढे ढकलण्यात आल्याचा आदेश काल जारी झाला होता. त्याअनुषंगाने रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, ‘‘ जवळपास तीन हजार मयत सभासदांच्या वारसाहक्कासाठी निर्णायक भूमिका घेवून लढलं पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती. विश्वासराव भोसले यांनी सुरुवातीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तथा सहसंचालक यांच्याकडे लढाई केली. त्यात काही अंशी यश आले तर काही अंशी अपयश आले. ही निवडणूक पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी आपली भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व सहकार मंत्री यांना त्यांनी पटवून दिली. त्यातून राज्यसरकारने ही निवडणूक पुढे ढकलली आहे’’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
संस्थापक सभासदांच्या वारसांना मतदानाचा अधिकार मिळावा ही आपली भूमिका : विश्वासराव भोसले
‘‘श्रीराम सहकारी कारखान्याने नियमांचे उल्लघन करुन मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व दिले नाही. या प्रारुप सभासद यादीवर आम्ही हरकत दाखल केली. त्यावर सुनावणीमध्ये या मयत सभासदांची नावे कमी करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्यांनी दिला. त्यामुळे या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संस्थापक सभासदांना नियमानुसार कारखान्याने शेअर्स ट्रान्सफरबाबत सुचना द्यायला पाहिजे होती. तसे न करता बोगस सभासद वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे संस्थापक सभासदांच्या वारसांना सभासदत्व मिळवून मतदानाचा अधिकार मिळावा ही भूमिका आपल्या याचिकेमध्ये आहे’’, असे विश्वासराव भोसले यांनी स्पष्ट केले.