ना. अजितदादा पवारांचे फलटणवर बारीक लक्ष : रणजितसिंह नाईक निंबाळकर

अजितदादांच्या नेतृत्त्वात फलटणचा विकास १००% होणार : आ. सचिन पाटील

। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।

‘‘आमदार सचिन पाटील यांची बॅटींग जोरदार सुरु आहे. झिरो बजेटमध्येसुद्धा फलटण तालुक्याला निधी मंजूर झाला आहे; ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिलेला प्रत्येक शब्द पाळत आहेत. यामध्ये विशेषत: ना. अजितदादा पवार यांनी फलटणवर आणि आमदार सचिन पाटील यांच्यावर विशेष लक्ष दिले आहे. फलटणचे आमदार वारंवार त्यांच्यासोबत असल्यामुळे त्याचा फायदा फलटणला होणार आहे’’, असा विश्‍वास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

फलटण तालुक्यासाठी अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीबाबत माहिती देताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, ‘‘ निरा – देवघरच्या २७४ कोटीच्या कामाला अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे. फलटणच्या नवीन प्रशासकीय भवनसाठी १९ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित निधी मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. महसूल भवनच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद झालेली आहे. निवासी क्रीडा संकुलासाठी ६ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.’’, असे सांगून ‘‘फलटणला इतका निधी आणणारा आमदार आता भेटला आहे. याच्या आधीचे आमदारही असा निधी आणू शकले असते. पण त्यांना दोरखंडात बांधले असल्यामुळे ते १० लाखाचा निधी आणण्याचीसुद्धा हिम्मत दाखवू शकले नाहीत’’, असा खोचक टोलाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी लगावला.

अजितदादांच्या नेतृत्त्वात फलटणचा विकास १००% होणार : आ. सचिन पाटील

‘‘प्रशासकीय भवन, रेव्हेन्यू क्लब, निवासी क्रिडा संकुल याला निधी मंजूर झाला आहे. शासकीय विश्रामगृहाचा विस्तार करण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे. निरा देवघरसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे, नाईकबोमवाडीच्या एमआयडीसीसाठी क्षेत्र वाढवून मिळाले आहे. त्यासाठी चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कामांमध्ये ना. अजितदादा पवार आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांना फलटणविषयी मोठी आस्था आहे. त्यामुळे अजितदादा व रणजितदादा ही ताकद आपल्या बरोबर असल्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही, फलटण तालुक्याचा विकास आता १००% होणार आहे’’, असा विश्‍वास यावेळी आ. सचिन पाटील यांनी व्यक्त केला.

Spread the love