। लोकजागर । सातारा । दि. १९ मार्च २०२५ ।
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणार्या कार्यकर्त्यांच्या गौरवार्थ दिल्या जाणार्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी सायकलवर फिरते वाचनालय उपक्रमाचे प्रवर्तक, खटाव तालुक्यातील काटेवाडी – बुध गावचे सुपुत्र जीवन इंगळे उर्फ सर्वोदयी यांची निवड करण्यात आली आहे.

संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य स्मृतीशेष सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या जन्मदिनी येत्या 26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता समाज कल्याण विभाग, साताराचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये विशेष समारंभात जीवन इंगळे गुरुजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य सुरेश खराते (खंडाळा) या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. आचार्य विनोबा भावे ट्रस्टचे विश्वस्त विजय दिवाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोळाव्या पुरस्काराचे मानकरी जीवन सर्वोदयी यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी, भूदान चळवळीतील कार्यकर्ते संभाजी शंकरराव इंगळे यांच्या प्रेरणेने गेले १७ वर्षे अखंडपणे फिरते ग्रंथालय वाचक चळवळ चालवली आहे. त्यांनी या उपक्रमाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत ३० हजार किलोमीटरची भ्रमंती केली आहे. त्यांनी ८ हजाराच्यावर ग्रंथ संग्रह जमवला असून केवळ एक रुपया नाममात्र आजीव सभासद फी घेऊन हे फिरते ग्रंथालय चालवले आहे. तसेच ते ग्रामस्वच्छता, पर्यावरण, लेक लाडकी अभियान आदी उपक्रमाद्वारे सामाजिक कार्य करत आहेत.
त्यांनी सन २०१० सर्वोदय सामाजिक संस्था स्थापन केली असून मुलांचे संस्कार वर्ग चालवले आहेत. खटाव तालुक्यातील महादेव दरा राजापूर डोंगर परिसरातील दोन एकरात गांधीग्राम उभारण्याचा संकल्प केला आहे.
त्यांनी ६१ वेळा रक्तदान केले आहे. त्यांना आतापर्यंत २४ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.