। लोकजागर । फलटण । दि. १९ मार्च २०२५ ।
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, शाखा फलटण यांच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय, फलटण येथे धरणे आंदोलन करून नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी राज्यातील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून निवेदन दिले. यामध्ये फलटण तालुक्यामध्ये सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी संघटनेच्या वतीने, 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा, 01 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, राज्यातील अनुदान धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी, मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांचे समायोजनाबाबत आदेश निर्गमित करावेत, शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 10-20-30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही त्वरित लागू करावी, प्रलंबित वाढीव पदाचे समायोजन त्वरित करावे, विनाअनुदानित वरून अनुदानितकडे बदली प्रस्तावास मान्यता द्यावी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा संलग्न तुकडी मध्ये 21 विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात 31 विद्यार्थी ग्राह्य धरावेत, एम. फील व पी.एचडी. धारकांना उच्चशिक्षणाप्रमाणे वेतन वाढ लागू करावी, निवृत्ती वय साठ वर्षे करावे, डीसीपीएस व एनपीएस योजनेतील शिक्षकांना हिशेब व देय रकमा देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला, शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे, घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांना महाविद्यालयीन शिक्षकाप्रमाणे मानधन द्यावे, उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतन वाढ देण्यात यावी, अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यास सेवेचा कालावधी वेतन वाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरावा, अकरावीचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरावीत, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी तहसील कार्यालय फलटण येथे धरणे आंदोलन करून आपले निवेदन नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांच्याकडे दिले.
यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद वाघ यांनी शिक्षकांच्या मागण्याचे निवेदन वाचून स्पष्ट केले. कोल्हापूर विभागीय प्रतिनिधी सतीश जंगम यांनी संघटनेच्या मागण्यांचे महत्व सांगून बीड येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्त्येबद्दल हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद वाघ, विभागीय प्रतिनिधी प्रा. सतीश जंगम, जिल्हा सदस्या प्रा.नीलम देशमुख, फलटण तालुका अध्यक्ष प्रा. पंकज बोबडे, फलटण शहराध्यक्ष प्रा. प्रीतम लोंढे, प्रा विकास तरटे, प्रा. सौ. पूनम काकडे, प्रा. रवींद्र कोकरे, प्रा शेखर मांढरे, प्रा. मिलिंद शिंदे या प्रतिनिधीसह शहर व तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते.