भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांची 14 मे 2025 पासून नियुक्ती

लोकजागर | नवी दिल्ली | दि. ३० एप्रिल २०२५

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांअंतर्गत, राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची 14 मे 2025 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. 

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा परिचय:

24  नोव्हेंबर 1960  रोजी अमरावती येथे जन्मलेले  गवई हे 16  मार्च 1985  रोजी बार कौन्सिलचे सदस्य  झाले. वर्ष  1987 पर्यंत त्यांनी माजी महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केले. 1987 ते 1990 या दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली. 1990  नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी वकीली केली. त्यांनी संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायदा या विषयात प्रॅक्टिस केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी/अधिकृत वकील होते.  

यानंतर वकील भूषण गवई यांनी ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहिले. 17 जानेवारी 2000 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील आणि सरकारी अधिवक्ता  म्हणून नियुक्ती झाली.   14 नोव्हेंबर 2003  रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती  मिळाली आणि 12  नोव्हेंबर 2005  रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी मुंबई येथील  मुख्य पदावर तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांवर सर्व प्रकारच्या नियुक्त्या असलेल्या खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले. 24  मे 2019  रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

गेल्या सहा वर्षांत, ते संवैधानिक आणि प्रशासकीय कायदा, नागरी कायदा, फौजदारी कायदा, व्यावसायिक वाद, लवाद कायदा, वीज कायदा, शैक्षणिक बाबी, पर्यावरण कायदा इत्यादी विविध विषयांशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या सुमारे 700 खंडपीठांचा भाग होते. त्यांनी विविध मुद्द्यांवरील संवैधानिक पीठाच्या निकालांसह सुमारे 300 निकाल दिले आहेत.


Spread the love