पालखी सोहळा प्रमुखांकडे भरुन द्यावा लागणार फॉर्म
। लोकजागर । अकलूज । दि. 15 जून 2025 ।
राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्या सोबत चालणाऱ्या सुमारे १ हजार ५०० दिंडीतील लाखो वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत रेनकोट देण्यात येणार असून सदर रेनकोट मिळविण्यासाठी दिंडी प्रमुखांना पालखी सोहळा प्रमुखांकडे विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन द्यावा लागणार आहे .

मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शासन, प्रशासन व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत रेनकोट देण्यात यावेत अशी मागणी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली होती. या मागणी प्रमाणे शासनाने वारकऱ्यांना मोफत रेनकोट देण्याचा निर्णय केला . ही रेनकोट मिळविण्यासाठी दिंडी प्रमुखांनी आपण ज्या पालखी सोहळ्यात चालतो त्या पालखी सोहळा प्रमुखांकडून विहीत नमुन्यातील फॉर्म घेवून तो दोन प्रतिमध्ये भरुन द्यायचा आहे .

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने दि . १६ जून ते १९ जून दरम्यान सदर फॉर्म आळंदी संस्थान कार्यालयात उपलब्ध केले आहेत . हे फॉर्म दिंडी प्रमुखांनी भरुन द्यायचे आहेत . फॉर्म सोबत दिंडीतील वारकऱ्यांची नावे भरुन द्यावी लागणार आहे. दिंडी प्रमुख , चालक , मालक यांनी आळंदी देवस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.

