पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

। लोकजागर । सातारा । दि. 17 जून 2025 ।

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी राज्यामध्ये हवामान अधारीत फळपीक विमा योजना राबविणेचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ मधील मृग बहारातील डाळींब, पेरु व सिताफळ या पीकांचा समावेश यामध्ये करणेत आला आहे. सदर योजनेमध्ये सन २०२०-२१ पासून काही बदल केले असून सदर योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. शेतक-यांनी फक्त ५ टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येईल. शेतक-यांनी ज्या शेतातील अधिसूचित फळपिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा ७/१२ उतारा व खाते उतारा (८ अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरणेची व्यवस्था करण्यात आली आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पिक असल्याचा स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.

योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरणेविषयीचे तसेच अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Spread the love