। लोकजागर । फलटण । दि. 04 जुलै 2025 ।
सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आज सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार असून त्याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या गावचे सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार याबाबत गावोगावी उत्सुकता निर्माण झाली आहे.

फलटण तालुक्यातील एकूण 131 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा एकदा सोडत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज शुक्रवार, दि. 4 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता सजाई गार्डन, मंगल कार्यालय (विमानतळाजवळ), फलटण येथे पार पडणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.

या आरक्षण सोडती कार्यक्रमाद्वारे ग्रामपंचायतीतील सरपंच पदांसाठी जातीय व सामाजिक आधारावर केलेले आरक्षण निश्चित केले जाईल. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडती करून निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार त्यावेळच्या आरक्षणांना रद्द करीत पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्याच्या 131 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी 5 वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिलावर्ग व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे फेरवाटप करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सन 2025 – 2030 या कालावधीत होणार्या फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आजची सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.
