पत्रकार युवराज पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. 07 जुलै 2025 ।
श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत प्रियदर्शनी दत्तक योजनेंतर्गत १०० गरजू व गुणवंत मुलींना दरवर्षी शालोपयोगी साहित्य, शालेय गणवेश, वैद्यकीय उपचार व मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर शिवम प्रतिष्ठान घारेवाडी अंतर्गत जे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमाचाही लाभ या मुलींना दिला जात असल्याचे सदगुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी निदर्शनास आणून दिले.

येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेमध्ये प्रियदर्शनी दत्तक योजनेंतर्गत मुलींना स्कूल बॅग व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप पत्रकार युवराज पवार यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले होते. यावेळी सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश पाठक, आनंदवन प्रा. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व त्यांचे सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना युवराज पवार म्हणाले, प्रियदर्शनी दत्तक योजनेंतर्गत राबवले जाणारे उपक्रम निश्चित कौतुकास्पद व प्रेरणादायी असून त्यातून गुणवंत विद्यार्थिनींना निश्चित प्रोत्साहन मिळेल. आपले ही या योजनेसाठी निश्चित सहकार्य राहील याची ग्वाही त्यांनी दिली.

आनंदवन प्रा. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात प्रियदर्शनी दत्तक योजनेविषयी माहिती दिली. सौ. रुपाली सस्ते यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.