गोखळी – राजाळे रस्त्याची दुरावस्था; संबंधित विभागाने त्वरीत दुरूस्ती न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

। लोकजागर । फलटण । दि. ०६ मार्च २०२५ ।

गोखळी – राजाळे रस्त्यावर तीन ठिकाणी पडलेले मोठ मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संबंधित विभागाने या खड्ड्यांची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी फलटण पूर्वभागातील नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.

आसू – देशमुखवाडी ते गिरवी – वारूगड पायथा या 47 कि.मी. रस्त्याचे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून वेगात सुरू झाले आहे. आसू देशमुखवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील शेवटचे गाव असून तेथून सातारा जिल्ह्यात आसू – पवारवाडी खटकेवस्ती, राजाळे, धुळदेवपर्यंत आणि गिरवी नाका, फलटण – निरगुडी – गिरवी वारुगड पायथा (जाधववाडा) येथपर्यंत हा रस्ता होणार आहे. गिरवी वारूगड बाजुकडून काम सुरू आहे. ते काम फलटण पर्यंत पूर्ण होण्यासाठी चार महिने लागतील असे कंपनीचे प्रमुख राम निंबाळकर यांनी सांगितले. मात्र फलटणपासून पुढे आसूपर्यंत जाण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील. डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.

मात्र सद्यःस्थितीत पूर्वभागातील गोखळी राजाळे दरम्यानच्या रस्त्यावरील मठाचीवाडी फाटा, खटकेवस्ती आणि गोखळी पाटी वळण येथे खूप मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या सुमारे 10 किमी अंतरावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. तर ठिकठिकाणी रस्ता खचलेल्या अवस्थेत आहे. यामुळे प्रवासी आणि वाहनचालक यांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवाशांच्या मणक्याचे दुखणे वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच याठिकाणचे खड्डे चुकवताना, तसेच रात्री अपरात्री हे खड्डे लक्षात येत नसल्याने अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन वाहनचालकांना तर अंदाज येत नसल्याने या ठिकाणाहून वाहन नेणे जिकरीचे होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघात झाले असल्याचे येथील नागरीक बोलून दाखवत आहेत.

तसेच राजाळे येथील साधारण शंभर मीटर रस्ता गेली दोन तीन महिने झाले संबंधित ठेकेदाराने चढ काढण्यासाठी खोदून ठेवला आहे. हे काम महावितरणच्या नावाखाली रखडवले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. प्रवाशांना आणि येथील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अशा स्थितीत गोखळी राजाळे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्त्याची त्वरीत दुरुस्ती न केल्यास पूर्व भागातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोखळी राजाळे दरम्यानच्या या तिन्ही खड्डेयांसह अनेक ठिकाणी पडलेले छोटे मोठे खड्डे,तर काही ठिकाणी खचलेला रस्ता यांची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Spread the love