| लोकजागर | फलटण | दि. १७ जुलै २०२५ |
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार संघटनेचे सातारा जिल्हा संघटक तथा पत्रकार किरण बोळे यांना जाहीर झाला आहे. धाराशिव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करीत आहे. ‘ग्राहकांचे अधिकार व त्यांची कर्तव्ये’ याबाबत जनजागृती करण्यात व ग्राहकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत याकरिता विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. संघटनेच्यावतीने राज्यातील ग्राहक चळवळीत उत्कृष्ट काम करणारे संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांना पुणे, नागपूर, नाशिक, मराठवाडा आणि कोकण या विभागातून ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ हा पुरस्कार दिला जातो.

यंदा २०२५ साठी किरण बोळे यांची पुणे विभागातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. २० जुलै रोजी धाराशिव येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
