| लोकजागर | फलटण |२१ऑगस्ट २०२५|
फलटण व माण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री ना. पियुष गोयल यांची सदिच्छा भेट घेऊन मौजे नाईकबोमवाडी (ता. फलटण) आणि मौजे म्हसवड (ता. माण) येथे नवीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

बैठकीदरम्यान औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती, नवीन उद्योग गुंतवणुकीस प्रोत्साहन, तसेच पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आल्याचे समजते.
मौजे नाईकबोमवाडी आणि मौजे म्हसवड या परिसरांमध्ये औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या जागा, रस्ते, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता याबाबत सविस्तर आढावा घेऊन पुढील टप्प्यातील प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याची तयारी करण्यात आली आहे.
याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यातील समन्वयातून औद्योगिक धोरणानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याची माहितीही संबंधित सूत्रांकडून देण्यात आली.
