फलटण-बिरदेवनगर मार्गावर कचऱ्याचा ढिगारा; दुर्गंधी व अपघाताचा धोका वाढला!

|लोकजागर |फलटण|दि.21 ऑगस्ट 2025|


फलटण-बिरदेवनगर मार्गावरील विमानतळाजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरीकांत संताप व्यक्त होत आहे.

विद्युत डीपी लगतच्या खड्ड्यात कचऱ्याचा मोठा ढिगारा साचला असून त्यातच काही लोक सर्रास कचरा टाकत आहेत. परिणामी दिवसेंदिवस या ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. पावसामुळे दुर्गंधी तीव्र झाली आहे.

या कचऱ्यातील उरलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही जनावरे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानंतरही या ठिकाणी योग्य स्वच्छता न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फलटण नगरपरिषद संजीवराजेनगर परिसरापर्यंत व जाधववाडी ग्रामपंचायत बिरदेवनगर नाळेमळा परिसरापर्यंत घंटागाडी चालवते, मात्र मध्यवर्ती भागाकडे दुर्लक्ष होत आहे.

फलटण आणि जाधववाडीच्या हद्दीत असल्याने या कचऱ्याची जबाबदारी कुणी घेत नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने कचऱ्याची व झाडाझुडपांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Spread the love