|लोकजागर |फलटण |दि.२३ ऑगस्ट २०२५|
फलटण तालुक्यातील सांगवी गावचा सोहम विजय टेंबरे हा केवळ सातवीत शिकणारा विद्यार्थी अमेरिकेतील नासाच्या भेटीसाठी निवडला गेला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या ‘विद्यार्थ्यांना नासा व इस्रो भेटीची संधी’ या उपक्रमांतर्गत ही निवड झाली.जिल्हाभरातून तब्बल 14 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
त्यातून केवळ 25 जणांची अंतिम निवड झाली असून, त्यामध्ये सोहम हा सर्वात कमी वयाचा विद्यार्थी ठरला आहे.
त्यामुळे फलटण तालुक्याचा व सातारा जिल्ह्याचा मान सातासमुद्रापार गेला आहे.सोहम हा सुप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू विजय टेंबरे यांचा सुपुत्र आहे.त्याच्या मेहनत, अभ्यासूवृत्ती आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने ही यशाची कमान गाठली आहे.
नासामध्ये अंतराळ व विज्ञान क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी त्याला मिळणार आहे.
या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने या दौऱ्याचा संपूर्ण खर्च उचलण्यात येणार आहे.आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व सीईओ गजानन पाटील यांनी सोहमचे अभिनंदन केले आहे.
