संमेलन बोधचिन्हाचे अनावरण
| लोकजागर | पुणे | दि. ११ सप्टेंबर २०२५ |
मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे. सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट करताना हे सरकार मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेची परंपरा शालेय शिक्षणात समाविष्ट व्हावी तसेच उत्तमोत्तम साहित्याचे मराठीत अनुवाद व्हावेत यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्यातील अमराठी व्यक्तींना मराठी शिकण्यासाठी लवकरच ॲप विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ज्ञानेश्वरी व गाथेतील विचार सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी मराठी भाषा विभागामार्फत प्रत्येकी एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचे सामंत यांनी नमूद केले. मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचावी यासाठी लंडनमध्ये वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विश्व साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन व युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ३३ वर्षांनंतर साताऱ्यास संमेलनाचे यजमानपद मिळाल्याचा आनंद व्यक्त करून साताऱ्याच्या परंपरेला शोभेल असे संमेलन करण्याचे आश्वासन दिले.
ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी साकारलेल्या बोधचिन्हामधील लेखणी व तलवारीचे प्रतीक साहित्यनिर्मितीबरोबरच सामाजिक दंभ व ढोंगावर प्रहार करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार सातारच्या पेढ्यांच्या हाराने करण्यात आला.
