। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।
सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाच्या वतीने फलटण तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर सौ. स्मृती जाधव (विज्ञान शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी) यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. श्री. योगेश ढेकळे यांनी प्रास्ताविक करताना सेवा भारतीचे कार्य व उद्दिष्टे उपस्थितांना सांगितली.

या प्रसंगी प्रांत सहसचिव सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत श्री. प्रवीण राव देशपांडे यांनी विज्ञान प्रयोगशाळेच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, तसेच सुसंस्कारित व जबाबदार नागरिक घडविण्यास हातभार लागेल असे प्रतिपादन केले. शिक्षक हे मुलांचे भविष्य घडवणारे खरे शिल्पकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील यांनी सेवा भारतीचे आभार मानत हा उपक्रम कायमस्वरूपी शाळेत राबविण्याची विनंती केली. यानंतर पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख श्री. पोपट बर्गे, जिल्हा शिक्षण आयाम प्रमुख श्री. मोहनजी ढाणे, प्रांत सहसचिव श्री. प्रवीण राव देशपांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ. नीता पाटणकर, जिल्हा निधी प्रमुख श्री. संजय श्रीखंडे, प्रकल्प शिक्षक श्री. योगेश ढेकळे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ आणि 136 विद्यार्थी अशा एकूण 150 जणांची उपस्थिती होती.
