। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।
समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विषमता दूर करणे व शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे मुख्य ध्येय होते. मानवता, समता, बंधुता, लोकप्रबोधन, लोकजागरण व नवसमाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे योगदान अतुलनीय आहे. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून स्त्रीशिक्षण, सदाचार व सामाजिक प्रश्नांवर परखड विचार मांडले. त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. भारतीताई गोरे यांनी केले.

सत्यशोधक समाजाच्या 152 व्या वर्धापन दिनानिमित्त व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त नायगाव येथे सुजन फाउंडेशनच्या महात्मा फुले विचार अभियान या विशेष उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. उज्वला हातागळे (पुणे), नायगाव ग्रामपंचायत सदस्य सौ. साधना नेवसे, सौ. रेश्मा कानडे, माजी प्राचार्य सौ. मंगल नेवसे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी एडवोकेट बिभीषण गदादे यांनी स्वतः सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध होऊन समाजासमोर आदर्श ठेवला. त्यांचा महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

याशिवाय सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रा. डॉ. उज्वला हातागळे, सौ. मेघा टिळेकर, सौ. भारतीताई गोरे, सौ. शितल शेळके, कुमारी कल्याणी रणसिंग, सौ. सपना शिंदे यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच नायगाव ग्रामपंचायत व खंडाळ्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्थेलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी फुले दांपत्यांचे कार्य, सत्यशोधक चळवळीचे योगदान आणि थोर समाजसुधारकांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. उज्वलाताई तांबे यांनी केले, सूत्रसंचालन अजित जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सुमन अडसूळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ मंडळ यांचे सहकार्य लाभले.
