। लोकजागर । फलटण । दि. 30 सप्टेंबर 2025 ।
अहिल्यानगर (पणदरे) येथे गेली १४ वर्षे जय तुळजाभवानी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने शारदीय नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. समाजप्रबोधन व जनजागृतीला चालना देण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

नवरात्रोत्सव वाचन संस्कृतीच्या माध्यमातून साजरा केला जातो. व्याख्याने, भारूड, सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण, योगासने, मैदानी खेळ, भजन, प्रवचन, देवीचा जागर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी सन्मान, विधवा माता पूजन अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भारले जाते. यासोबतच महाआरती व महाप्रसादही आयोजित केला जातो. वाढदिवस केक न कापता फलछेदन, वृक्षारोपण आणि ग्रंथवाटपाने साजरा करण्याची अनोखी परंपरा मंडळाने सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे मंडळ वर्गणी न मागता स्वेच्छेने लोकवर्गणीतूनच दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करते.

जिल्हा प्राथमिक शाळा, अहिल्यानगर ही आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीही या शाळेत दाखल होऊन प्रगती करत आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी मंडळामार्फत सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ दिले जाते. तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले जाते.
मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार जाधव, आबासो कोकरे, बापूराव दादासो कोकरे, सचिन कोकरे, महेश झोरे, अमोल भिसे, आदेश कोकरे, मधुकर कोकरे, प्रदीप कोकरे, बापूराव रामचंद्र कोकरे, भानुदास कोकरे, डॉ. नितीन कोकरे यांसह सर्व विश्वस्त मंडळी परिश्रम घेतात.
ग्रामस्थ, माता-भगिनी व पंचकोशीतील भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शारदीय नवरात्रोत्सव व्याख्यानमाला हे ग्राम संस्कृतीचे एक महत्त्वाचे पर्व ठरले आहे.
