भोसले दांपत्य सामाजिक भान जपत समाजसेवेत अग्रणी — ह.भ.प. बंड्या तात्या महाराज

। लोकजागर । फलटण । दि. 13 ऑक्टोबर 2025 ।

आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडणारे दिलीपसिंह भोसले हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक कार्यात भोसले दांपत्य सदैव हिरिरीने सहभाग घेत असतात, असे प्रतिपादन व्यसनमुक्ती संघटनेचे प्रमुख ह. भ. प. बंड्या तात्या महाराज कराडकर यांनी केले.

श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, स्वयं सिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, वारकरी संघटनेचे ह. भ. प. केशवराव जाधव महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

ह. भ. प. बंड्या तात्या महाराज म्हणाले, “ज्या व्यक्तीच्या अंगी चांगले गुण असतात अशाच व्यक्तींना लोक मान देतात. दिलीपभैय्या आणि डॉ. जोशी समाजाशी असलेली बांधिलकी विसरले नाहीत, उलट सर्वस्व झोकून देत आहेत.” त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचेही कौतुक केले.

यावेळी कोपर्डे गावात दहा हजार झाडे लावून ‘ज्ञानेश्वरी उपवन’ उभारण्याची माहिती देत, “या उपवनात नारळाची झाडे भेट स्वरूपात लावावीत, कारण नारळ हे कल्पवृक्ष आहे आणि आपण समाजाचे कल्पवृक्ष आहात,” असे बंड्या तात्या महाराज म्हणाले.

या प्रसंगी श्री. दिलीपसिंह भोसले आणि डॉ. प्रसाद जोशी यांनी प्रत्येकी १०१ उत्कृष्ट दर्जाची नारळाची रोपे ज्ञानेश्वरी उपवनासाठी भेट देण्याची घोषणा आपल्या मनोगतातून केली.
प्रास्ताविक ह. भ. प. केशवराव महाराज यांनी केले.

Spread the love