। लोकजागर । फलटण । दि. 14 ऑक्टोबर 2025 ।
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबवण्यात येणारा ‘महायुती फॅक्टर’ तालुकानिहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभावीपणे राबवला जाईल. मात्र फलटण तालुक्यात मित्र पक्षांनी शिवसेनेचा विचार केला नाही, तर आम्ही स्वबळावर सर्व निवडणुका ताकदीने लढवण्यास तयार आहोत. फलटणकरांना तिसरा सक्षम पर्याय हवा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत,” असे शिवसेना फलटण तालुका संघटक विजयराव मायने यांनी सांगितले.

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासह सर्व सत्तावीस उमेदवारांची यादी तयार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार देखील निश्चित असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. तालुक्यातील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती विजयराव मायने यांनी देवून ह्या कार्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ताकद देण्याचे आश्वासन दिलेले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जातील, असेही विजयराव मायने यांनी नमूद केले.


