रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमीपूजन
। लोकजागर । फलटण । दि. 25 ऑक्टोबर 2025 ।
‘‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी फलटण दौर्यावर येत असून, त्यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या भव्य मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी, महिला, बांधकाम व श्रमिक कामगार, तसेच नागरिक लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने फलटणच्या विकासाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती देवेंद्र फडणवीस करतील’’, असा विश्वास माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील यशवंतरावच चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
मेळाव्याच्या निमित्ताने निरा – देवघर प्रकल्पाच्या उर्वरित दुसर्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल भवनच्या इमारतीचे भूमीपूजन, शहरातील सिमेंट रस्त्याचे हस्तांतर, फलटण – दहिवडी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्त्यांचे भूमीपूजन, फलटण – गिरवी रस्त्याचे लोकार्पण, फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, तसेच वाठार पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतींचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण तालुक्यातील प्रलंबीत कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यामध्ये फलटण शहरातील रस्त्यांच्या अवस्था दयनीय असून शहरातील खड्डे बुजवण्यासाठी तरतूद व्हावी, पाडेगाव – मुरुम – साखरवाडी – कोळकी – शिंगणापूर या नवीन रस्त्याला तात्विक मंजूरी दिली होती त्या रस्त्याची घोषणा करावी, बाणगंगा नदी कायमस्वरुपी प्रवाहीत राहण्यासाठी अमृत 2 योजनेत समावेश झालेला आहे याचे काम सुरु व्हावे, एकत्रित न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली आहे, निरा देवघर प्रकल्पातील तीन लिफ्टच्या निधीची घोषणा व्हावी , फलटणच्या विमानतळावर छोटी विमाने उतरण्याची आणि नाईट लँडींगची सुविधा व्हावी, अप्पर जिल्हाधिकारी आणि साखरवाडी तहसिल पदनिर्मितीची घोषणा करावी, नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये लार्ज मेगा प्रोजेक्टची मागणी , पुणे – पंढरपूर रोडला जोडणार्या नवीन बाह्ववळण मार्गाची मागणी, झिरपवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे पुर्नजीवन करण्याची मागणी आदी कामांचा समावेश आहे. फलटणच्या विकासाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. या मागण्या पूर्ण होतीलच शिवाय यातील काही कामांच्या घोषणाही ते करतील. फलटणबाबत आपलेपणाची वागणूक त्यांनी नेहमीच दिली आहे. त्यामुळे फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती देवेंद्र फडणवीस करतील, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आ. सचिन पाटील यांच्या काळामध्ये फलटण तालुका जिल्ह्यातील अग्रगण्य तालुक्याकडे वाटचाल होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांचे सहकार्या लाभत असल्याचेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

