। लोकजागर । फलटण । दि. 25 ऑक्टोबर 2025 ।
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपंदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात फलटण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटनेने या दोघांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव आणि सचिव डॉ. भगवान मोहिते यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बदणे आणि बनकर या दोघांवर वारंवार अवमानकारक वर्तन व मानसिक छळ केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या प्रकरणी सखोल तपास करून दोन्ही आरोपींवर तातडीने बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची तसेच जर या प्रकरणात त्वरीत न्याय मिळाला नाही, तर राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

संघटनेच्या या निवेदनावेळी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. भगवान मोहिते, डॉ. अनिल कदम, डॉ. वैभव राठोड, डॉ. आबा मोहिते, डॉ. संदीप यादव, डॉ. सौ. झेंडे, डॉ. सौ. बडे, डॉ. पाटील आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

