। लोकजागर । फलटण । दि. 29 ऑक्टोबर 2025 ।
‘‘गेल्या 30 – 35 वर्षात न झालेली अनेक विकासकामे रणजितदादांनी तालुक्यात मंजूर करुन आणलेली आहेत. रेल्वे, रस्ते, पाणी, प्रशासकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. रणजितदादांची सुरु असलेली ही घोडदौड रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत. परंतू हा प्रयत्न कुणीही केला तरी ही घोडदौड रोखली जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी सुरु केलेल्या या घोडदौडीत मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे’’, अशी ठाम भूमिका फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केली.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हॉटेल मधुदिप वर विरोधकांकडून केल्या जाणार्या टिकेला उत्तर देण्यासाठी येथील महाराजा आयकॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिलीपसिंह भोसले बोलत होते. यावेळी तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
विरोधकांच्या टिकेमागे विकृत मास्टरमाईंड : दिलीपसिंह भोसले यांची नाव न घेता टिका
‘‘सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांना कुणा मास्टर माईंडची नक्कीच फूस आहे. एखाद्याला बदनाम करणे ही विकृती त्यांची आहे. विरोधकांनी यापूर्वी कोरेगांव पॅटर्न वापरला होता, माण पॅटर्न वापरला होता आणि फलटण पॅटर्न सुरु केला आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. विरोधकांनी आपली ही विकृत प्रवृत्ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीने विचार करुन तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे उभं रहावं’’, असा टोला दिलीपसिंह भोसले यांनी लगावला.
या प्रकरणात ‘हत्या’ हा राजकीय शब्द ‘आत्महत्या’ हा खरा शब्दा : दिलीपसिंह भोसले
‘‘सदरची पिडीत महिला स्वत: दुचाकी घेवून हॉटेलमध्ये आली. तिनी रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहीले आणि मग ती रुममध्ये गेली. त्यानंतर तिझ्या रुममध्ये कुणीही गेले नाही. बराच वेळ रुम न उघडली गेल्यामुळे संशय आल्याने आम्ही आमच्याकडील चावीने रुम उघडल्यानंतर तीने आत्महत्या केली असल्याचे उघड झाले. याचे सगळे पुरावे पोलीसांना दिलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ‘हत्या’ हा राजकीय शब्द असून ‘आत्महत्या’ हा खरा शब्द आहे’’, असेही दिलीपसिंह भोसले यांनी नमूद केले.
होय ! मी नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार : दिलीपसिंह भोसले
‘‘सुषमा अंधारे यांनीच आपल्या विधानात मी नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार असल्याचं सांगितलं. मी नक्कीच त्या पदाचा संभाव्य उमेदवार आहे. पक्षाकडे मी तशी मागणीही केली आहे पण पक्षाने अद्याप घोषणा केलेली नाही. पक्षाने जर उमेदवारी दिली तरच मी ही निवडणूक लढवणार आहे’’, असेही दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी सुस्पष्ट केले.
