इच्छुकांची गर्दी भरपूर, पण फलटणकर म्हणतायत ‘विकासाचं बोला’

। लोकजागर । फलटण । दि. 9 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषदेची निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकताच कार्यक्रम जाहीर केला असून, 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 13 प्रभागांमधून 27 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.

यावेळीची प्रभाग रचना मात्र न भूतो न भविष्यती अशी बदलली आहे. गेल्या काही दशकांपासून ज्या भागात एकाच कुटुंबाची, किंवा गटाची पकड होती त्या वॉर्डांची सीमारेषा आता पूर्ण बदलल्याने कुणालाच आपल्या विजयाची खात्री नाही. म्हणूनच प्रत्येक गल्लीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. कोणी गटप्रमुखांकडे धाव घेतोय, तर कोणी नगराध्यक्षपदासाठी चाचपणी करतोय. पण या सगळ्या गदारोळात नागरिकांचा आवाज मात्र काहीसा वेगळाच आहे.

‘‘निवडणुकीत सगळेजण घरी येतात, विचारपूस करतात. पण निवडून आल्यानंतर एखादं काम झालं तरी नवलं मानावं लागतं’’, असं एका स्थानिक नागरिकाने सांगितलं. तर काही तरुण म्हणाले, ‘‘आम्हाला राजकारण नको, काम दाखवा. फलटण वाढतंय, पण नियोजनाशिवाय.’’ नगरपरिषदेमध्ये इतक्या वर्षांत कित्येक नगरसेवक बदलले, नगराध्यक्ष बदलले, पण नागरिकांच्या तक्रारी मात्र जुन्याच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नागरिकांनी विकास, स्वच्छता आणि नियोजन या मुद्यांवरच मत मागणार्‍या उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.

157 वर्षांची नगरपरिषद, पण अजूनही प्रश्‍न तेच !

फलटण नगरपरिषदेला सुमारे 157 वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळाचा जरी विचार केला तरी गेल्या 78 वर्षांच्या दीर्घ प्रवासात शहरातील अनेक मूलभूत सुविधा आजही नागरिकांच्या तोंडी तक्रार म्हणूनच आहेत.

शहरात आजही 24 तास पाणी पुरवठा नाही.
मुख्य रस्ते आणि उपरस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
रात्री पथदिवे कमी, काही भागात संध्याकाळीच काळोख पसरतो.
शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा अभाव आहे.
स्वच्छतेचा बोजवारा उडालाय, कचरा संकलन अनियमित असून विविध ठिकाणी अस्वच्छतेचे नियमित चित्र आहे.
भाजी विक्रेते आणि लहान व्यापार्‍यांचे प्रश्‍न कायम आहेत – ना ठराविक जागा, ना पुरेशी सुविधा ही त्यांची जुनी तक्रार आहे.
वारेमाप संकलित कर पण त्या बदल्यात सुविधांचा तुटवडा ही फलटणकरांची नेहमीची तक्रार आहे.

आतापर्यंत फलटणमधील प्रमुख राजकीय गट आपापला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजे गट असो किंवा खासदार गट – प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. मात्र, या सगळ्या राजकीय रंगात फलटणकर सामान्य माणूस फक्त एवढंच म्हणतोय – ‘‘ आपल्या फलटणमध्ये इच्छुकांची गर्दी भरपूर आहे, पण ‘विकासाचं’ कुणीच काही बोलना राव !’’

Spread the love