फलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

| लोकजागर | फलटण | दिनांक 11 नोव्हेंबर 2025 |

फलटण शहरात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिक, व्यापारी, महिला व युवक वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या विकासासाठी दादांचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत असून, त्यांच्या भेटीगाठींना मोठी गर्दी होत आहे.

गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध विकासकामांबाबत ठाम भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या यासारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचा सौम्य स्वभाव, तात्काळ निर्णयक्षमता आणि सर्व घटकांशी सुसंवाद या गुणांमुळे शहरवासीयांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे.

सध्या ते विविध भागांतील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत असून, शहराच्या पायाभूत सुविधांबाबत त्यांच्या सूचना घेत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “फलटणचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि जबाबदार प्रशासन” हेच आपले उद्दिष्ट असल्याचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

विरोधकांचा प्रचार अद्याप गती पकडलेला नसतानाच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार मोहिमेचा जोर वाढताना दिसत आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि नागरिकांशी थेट संपर्कामुळे शहरात “बदलाच्या नेतृत्वाची” चर्चा रंगत असून, त्यांच्या सभोवती जनतेचा वाढता उत्साह आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Spread the love