। लोकजागर । पुणे । दि. २२ नोव्हेंबर २०२५ ।
समाज क्रांतिकारक महात्मा जोतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, पूना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅन्डी यांच्या हस्ते पुणे येथील विश्रामबाग वाड्यामध्ये १६ नोव्हेंबर १८५२ रोजी महात्मा फुले यांचा प्रमुख सरदार यांच्या उपस्थितीत शाल-जोडी देऊन सत्कार करण्यात आला होता. या घटनेच्या १७३ व्या सुस्मरणीय दिनानिमित्त विश्रामबाग वाडा आणि महात्मा फुले वाडा (समता भूमी) येथे महात्मा फुले यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम ‘महात्मा फुले विचार अभियान’ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी, महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता, सामाजिक, सत्यशोधन, जाती निर्मूलन आणि स्त्री शिक्षण या क्रांतिकारी कार्याचा कृतिशील प्रचार व प्रसार करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मानपत्र व महात्मा फुले यांच्या प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. पुणे शहर व परिसरातील ५००० हून अधिक महिलांचे संघटन करून, महिलांना संवादासाठी एक विचारपीठ तयार करून सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक समस्यांवरती उपाययोजना करणारे कृतिशील कार्य करणाऱ्या महिलांच्या मॅग्नोलिया समूहाला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, माजी सरपंच सौ. साधना गावडे (गुणवरे) व ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या संगीता बोराटे (हडपसर), सौ. कमल ननावरे, सौ. शुभांगी गिरमे, सौ. दिपाली गायकवाड, सौ. तेजश्री शेलवंटे (मॅग्नोलिया समूहाच्या सदस्या), वकील लक्ष्मी कांबळे, वकील राणीताई सोनवणे, कुसुमावत्सल्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. वैशाली पाटील, महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी श्री. तेजा भास्कर, मातंग विकास संस्था पुणेचे अध्यक्ष श्री. राजेश राजगे, नितीनकाका बोराटे, शशिकांत बोराटे, श्री प्रशांत फुले, गणेश झुरंगे, श्री प्रशांत शिंदे, रोहिदास शिंदे, प्रकाश डोके (महात्मा फुले मित्र मंडळ सदस्य), बाळासाहेब भालेराव, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत फुले, पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा सेवक श्री. नितीन लोखंडे यांसह अनेक फुलेप्रेमी उपस्थित होते. उपस्थित सर्व फुलेप्रेमींना फुले दांपत्याची प्रतिमा भेट देण्यात आली.
अजित जाधव (महात्मा फुले विचार अभियान) यांनी राबवलेल्या या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि उपस्थित फुलेप्रेमींचे आभार सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका प्रा. डॉ. उज्वलाताई मोरे यांनी मानले. हा कार्यक्रम महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प दृढ करणारा ठरला.
