फलटणला शिवसेना व आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
। लोकजागर । फलटण । दि. 23 नोव्हेंबर 2025 ।
‘‘फलटणला दहशतीचं वातावरण आहे असे सांगितले जात आहे. पण शिवसेनेपुढं कुणाची दहशत चालणार नाही. फलटण शहरातील नागरिकांना निर्भयपणाने जगता यावं असं मोकळ आणि निर्मळ वातावरण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये आपण निर्माण करु. एकनाथ शिंदे यांच्या नावाला साजेसा दणदणीत विजय आपल्याला मिळवायचा आहे. त्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे’’, असे आश्वासन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.
शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा – भिमा विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ येथील श्रीराम मंदीरानजिक पार पडला. त्यावेळी आयोजित सभेत ना. शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, कॉँग्रेसचे सचिन सूर्यवंशी – बेडके, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांची उपस्थिती होती.
‘‘फलटणच्या राजे परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात काम करण्याचा निर्णय घेतला याचा आनंद आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीत राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही. लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटूंबाकडे आहे. जिवाला जीव देणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. 28 तारखेला ते फलटणला येणार आहेत. त्यांच्यारुपाने राज्याचे नगरविकास खातेच फलटणला येणार आहे’’, असे सांगून ‘‘इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जो प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असेल त्याच्यावर कडक शासन होईल’’, असा इशाराही ना. देसाई यांनी यावेळी दिला.
इथल्या विकासाचे मास्टरमाईंड श्रीमंत रामराजे : दीपक चव्हाण
‘‘श्रीमंत रामराजेंनी फलटण तालुक्याला विकासाची दिशा दिली आहे. फलटण शहर एक नामाकिंत आणि सुसंस्कृत शहर आहे. इथल्या विकासाचे मास्टरमाईंड श्रीमंत रामराजे आहेत. फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी आपण शिवसेनेत सर्व गेलो आहोत. इथली दहशत आपल्याला संपवायची आहे. आता दहशत फक्त शिवसेनेचीच असे अधोरेखित करुन आ. दीपक चव्हाण म्हणाले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची तुलना होऊ शकत नाही. आपले उमेदवार सुशिक्षीत आणि तरुण आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराचा विकास होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आता असुरक्षिततेची भावना समुळ नष्ट होईल : श्रीमंत रघुनाथराजे
‘‘शिवसेनेच्या माध्यमातून आता आपण वेगळ्या दिशेने आणि मार्गाने निघालो आहोत. फलटण, सातारा, कराड आणि पाटण जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्णायक निकाल घेऊन येतात. आगामी काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेना ठरवेल असे सांगून खंबाटकी घाटाच्या अलिकडचा संपूर्ण भाग आम्ही भगवा करुन दाखवू’’, अशी ग्वाही देवून ‘‘कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना समूळ नष्ट होईल. आपण प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करु’’, असे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
आता जे काही बरे – वाईट होईल ते शिवसेनेतच : श्रीमंत संजीवराजे
‘‘फलटणला रामराजेंनी घालून दिलेली शांततेची आणि सुसंस्कृतपणाची घडी विस्कटू नये त्यासाठी काही निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे फलटण शहर व तालुक्याला योग्य दिशेने नेण्यासाठी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय झाला आहे. सर्वसामान्यांची कामं व्हावीत, त्यांना आधार व संरक्षण मिळावं त्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावनेची कदर करुन आपण हा निर्णय घेतला. अत्यंत कमी वेळात कार्यकर्त्यांनीही त्याला समर्थन दिलं. आता जे काही बरे वाईट होईल ते शिवसेनेतच होईल; हा आपला अंतिम निर्णय आहे’’, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
‘‘श्रीमंत अनिकेतराजेंच्या रुपाने आपल्याला नगराध्यक्षपदासाठी चांगला उमेदवार मिळाला आहे. त्यांच्यासमवेत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. फलटणला पिण्याच्या पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही असे काम रामराजेंनी केला आहे. शेतीसाठी, उद्योगासाठी कामे केली आहेत. कार्यकर्त्यांनी ही कामे ठासून सांगितली पाहिजेत. आपण ताकदीने ही निवडणूक पार पाडू आणि चांगल्या मताधिक्याने जिंकू अशा पद्धतीने कामाला लागा, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले.
फलटणसाठी सर्वतोपतरी काम करणार : श्रीमंत अनिकेतराजे
फलटणमध्ये पसरलेलं भितीचं वातावरण आपण शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे निघून जाणार आहे. शासकीय यंत्रणांचा झालेला गैरवापर थांबवावा याकडे ना.शंभूराजे देसाई यांचे लक्ष वेधून फलटण शहरासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी काम करणार, अशी ग्वाही श्रीमंत अनिकेतराजे यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, शरद कणसे, चंद्रकांत जाधव यांचीही भाषणे झाली. आभार मिलींद नेवसे यांनी मानले.
